'त्याबद्दल धोनीने कधीच संवाद साधला नाही', सेहवागचे गंभीर आरोप

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा एमएस धोनीवर निशाणा साधला आहे.

Updated: Feb 1, 2020, 07:26 PM IST
'त्याबद्दल धोनीने कधीच संवाद साधला नाही', सेहवागचे गंभीर आरोप

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा एमएस धोनीवर निशाणा साधला आहे. २०१२ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे सीरिजमध्ये सेहवाग, तेंडुलकर आणि गौतम गंभीर या तिघांपैकी दोघांनाच आळीपाळीने खेळवलं जाईल, कारण हे तिघं संथ फिल्डर असल्याचं धोनीने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, पण आम्ही संथ फिल्डर असल्याचं तो ड्रेसिंग रूममध्ये कधीच म्हणाला नाही. याबाबत टीमच्या बैठकांमध्ये धोनीने कधी संवाद साधला नाही, असे आरोप सेहवागने केले आहेत.

रोहित शर्माला संधी देण्यासाठी तिघांपैकी दोघांनाच आळीपाळीने खेळवता येईल, असं धोनीने ड्रेसिंग रुममध्ये सांगितलं. पण माध्यमांमध्ये आम्ही संथ फिल्डर असल्याचं सांगण्यात आलं. आम्ही संथ फिल्डर असल्याचं माध्यमांमधूनच कळलं, असं वक्तव्य सेहवागने केलं आहे.

ऋषभ पंत टीममध्ये असूनही त्याला अंतिम-११ मध्ये संधी मिळत नाही, याबाबत कोहली पंतशी संवाद साधत असेल का? असा प्रश्न सेहवागला विचारण्यात आला, त्यावेळी बोलताना सेहवागने धोनीवर आरोप केले. 'विराट पंतशी बोलतो का नाही ते मला माहिती नाही, कारण मी टीम यंत्रणेचा भाग नाही. पण आशिया कपमध्ये रोहित शर्मा खेळाडूंशी संवाद साधायचा,' असं सेहवाग म्हणाला.

'ऋषभ पंतला तुम्ही टीमबाहेर ठेवलं तर तो रन कसा करेल? सचिन तेंडुलकरलाही तुम्ही बाहेर बसवलं असतं तर त्यानेही रन केल्या नसत्या. जर पंत तुम्हाला मॅच जिंकवून देणारा खेळाडू वाटत असेल, तर मग त्याला बाहेर का ठेवता? त्याच्यात सातत्य नाही म्हणून?' असा सवाल सेहवागने उपस्थित केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये ऋषभ पंतच्या डोक्याला बॉल लागल्यानंतर केएल राहुलने विकेट कीपिंग केली. यानंतर राहुलने विकेट कीपिंग आणि बॅटिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे आता राहुलच या दोन्ही भूमिका पार पाडत आहे. याच कारणामुळे पंतला बाहेर बसावं लागत आहे. राहुल दोन्ही भूमिका निभावत असल्यामुळे टीमला स्थिरता मिळत आहे, असं कोहली म्हणाला. न्यूझीलंड दौऱ्यातल्या ४ टी-२० मॅचनंतरही पंतला संधी मिळालेली नाही.