पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार का? पाहा धोनीने काय म्हटलं...

धोनीची टीम चेन्नई सुपरकिंग्जचं आयपीएल 2020 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे.

शैलेश मुसळे | Updated: Nov 1, 2020, 05:02 PM IST
पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार का? पाहा धोनीने काय म्हटलं...

दुबई : महेंद्रसिंह धोनी पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळतानाही दिसणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. यंदाच्या सत्रात रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आपला अंतिम लीग सामना खेळत आहे. चेन्नई प्लेऑफमधून बाहेर झाली आहे. त्यामुळे त्यांचा आयपीएलमधील प्रवास आता थांबणार आहे. पण पुढच्या वर्षी धोनीच पुन्हा संघाचं नेतृत्व करणार का? याबाबत तुम्हाला ही प्रश्न असेल.

धोनीने म्हटलं की, हा त्याचा शेवटचा सामना नाहीये. त्यामुळे पुढील वर्षी तो चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार आहे. न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅनी मॉरिसनने धोनीला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धचा सामना चेन्नईसाठीचा शेवटचा सामना आहे का असे विचारले असता तो म्हणाला की, "निश्चितच नाही". त्यांच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया येऊ लागल्या.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोविडमुळे ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 वर्ल्डकप रद्द झाल्यानंतर धोनीने यावर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु आयपीएलमध्ये किमान दोन वर्षे तो खेळण्याची शक्यता होती. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात धोनीने वनडे विश्वचषकात भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.

चेन्नईसाठी हा हंगाम खूप निराशाजनक होता. तीन वेळा चॅम्पियन राहिलेला संघ प्रथमच प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरला. पुढच्या वर्षी एप्रिल-मेमध्ये आयपीएल होणार आहे, परंतु जगावर आलेल्या कोरोना संकटामुळे तारीख बदलली जाऊ शकते.