कोरोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलणार? लवकरच निर्णय

यासंदर्भात लवकरच निर्णय होणार आहे.

Updated: Mar 7, 2020, 05:58 PM IST
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलणार? लवकरच निर्णय title=
फाईल फोटो

नागपूर : कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय होईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना व्हायरसच्या संकटाशी दोन हात करण्यात राज्य सरकारची तयारी पूर्ण झाली आहे. सरकारने कोरोना संदर्भात परिपत्रक काढून काही सूचना केल्या आहेत. 

राज्यात मेळावे, यात्रा, कार्यक्रम घेण्यापासून लोकांना परावृत्त करण्याच्या राज्य सरकारने सूचना केल्या आहेत. कोरोना व्हायरस संदर्भात आशा वर्कर्सना ११ ते १३ मार्च दरम्यान ट्रेनिंग दिलं जाणार आहे. घाबरून जाण्याची गरज नाही. मास्कची गरज नाही. त्यामुळे मास्कची साठवणूक करू नका असं टोपे यांनी म्हटलंय. कोरोना व्हायरस बाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहे, शाळा बंद करा, काही शासकीय कार्यालयात बायोमेट्रोक पद्धती बंद करण्यात आली आहे, हे चुकीचं आहे असं ते म्हणाले. 

जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे मोठं संकट उभं राहिलं आहे. याचा फटका आता क्रिकेटला बसला आहे. आयसीसीने या कारणामुळे क्रिकेट वर्ल्ड कप चॅलेंज लीग ए स्पर्धेची तारीख पुढे ढकलली आहे. क्रिकेट वर्ल्ड कप चॅलेंज लीग एमध्ये कॅनडा, डेन्मार्क, मलेशिया, कतार, सिंगापूर आणि वानुआतू या टीम सहभागी होणार होत्या. ही स्पर्धा आता वर्षाच्या शेवटी होईल, अशी अपेक्षा आयसीसीने व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरसमुळे आम्ही ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया आयसीसीने हेड ऑफ इव्हेंट्स क्रिस टेटले यांनी दिली.