'मला अर्धशतकही करता येत नाहीये,' बाबर आझमच्या निवृत्तीची पोस्ट व्हायरल, पण काही वेळातच...

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या आपल्या खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी झाला आहे. आपल्या फॉर्मशी त्याचा संघर्ष सुरु असतानाच, त्याने निवृत्ती जाहीर केल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 3, 2024, 02:42 PM IST
'मला अर्धशतकही करता येत नाहीये,' बाबर आझमच्या निवृत्तीची पोस्ट व्हायरल, पण काही वेळातच... title=

सोशल मीडिया (Social Media) एक असं ठिकाणी आहे जिथे कधी तुम्हाला डोक्यावर चढवून जयजयकार केला जातो, तर दुसऱ्या क्षणी तुम्हाला जमिनीवर फेकलं जातं. सोशल मीडियावर मिळणारी प्रसिद्धी ही कायमची नसते हे आता सर्वांनाच समजलं आहे. पाकिस्ताना संघाचा पोस्टर बॉय बाबर आझम सध्या याचा अनुभव घेताना दिसत आहे. वर्षभरापासून बाबर आझम (Babar Azam) आपल्या खराब फॉर्ममुळे टीकेचा धनी झाला आहे. क्रिकेट समीक्षक, पाकिस्तानी चाहते त्याला लक्ष्य करत असतानाच आता त्याच्या नावे एक खोटी पोस्ट व्हायरल झाली आहे. 

बांगलादेशविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही बाबर आझम फार चांगली कामगिरी करु शकलेला नाही. रावळपिंडी येथील कसोटीत दोन्ही डावात तो फक्त 31 आणि 11 धावा करु शकला. यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एक्सवर ही पोस्ट करण्यात आली आहे. 

सोमवारी दुपारी बाबर आझमच्या नावे पहिली पोस्ट करण्यात आली. पोस्टमध्ये वापरण्यात आलेले शब्द इतके सफाईदार होते की खरंच बाबर आझमने निवृत्ती जाहीर केली असं वाटत होतं. पहिली पोस्ट क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेत असतानाच दोन तासांनी दुसरी एक पोस्ट शेअर करण्यात आली. या अकाऊंटचे फॉलोअर्स जास्त होते आणि प्रीमिअम सबस्क्रिप्शन होतं. म्हणजेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोस्ट पोहोचली. 

'Babar Azam - Parody' हँडलवरुन शेअर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने त्याच्या कार्यकाळात फलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्या तयार केल्याबद्दल खिल्ली उडवली होती.

बाबर आझमची खराब कामगिरी 

बाबर आझम गेल्या 12 महिन्यांतील त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. गतवर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर त्याने एकदिवसीय संघाचं कर्णधारपद गमावले. एकदिवसीय आणि कसोटीमध्ये तो आतापर्यंतच्या सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. त्याने 10 कसोटी डावांमध्ये 19 च्या सरासरीने फक्त 190 धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची सरासरी 34 इतकी घसरली आहे. या कालावधीत टी-20 मध्ये त्याने 38 च्या सरासरीने धावा केल्या. पण त्याच्या फलंदाजीचा संघाला फारसा फायदा झाला नाही. अमेरिकेकडून पराभूत झाल्याने पाकिस्तान टी-20 विश्वचषक गटातून बाद झाला.

टी-20 विश्वचषकात बाबर आझमने चार सामन्यांत त्याने 40.66 च्या सरासरीने 122 धावा केल्या. पण त्याच्या 101.66 च्या खाली असलेल्या स्ट्राइक रेटबद्दल त्याच्यावर जोरदार टीका झाली. बाबरने गतवर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 21 च्या सरासरीने 126 धावा केल्या होत्या. T20 विश्वचषकापूर्वी, पाकिस्तानने 4 टी-20 सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला होता. दोन सामन्यांमध्ये बाबरने 34 च्या सरासरीने 68 धावा केल्या.

बांगलादेशविरुद्ध सध्या सुरु असलेल्या मालिके  चार डावांत बाबरने फक्त 64 धावा काढल्या आहेत. पाकिस्तानच्या आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आपला फॉर्म पुन्हा मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पण असं असतानाही ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज आणि पाकिस्तानचे विद्यमान कसोटी मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. "बाबर हा दर्जेदार खेळाडू आहे. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. मला विश्वास आहे की बाबरला आपण लवकरच काही मोठ्या धावा करताना पाहणार आहोत," असं गिलेस्पी म्हणाले.