मुंबई : बांगलादेशचा माजी अष्टपैलू खेळाडू मुशर्रफ हुसेन (Mosharraf Hossain) यांचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची मेंदूच्या कर्करोगाशी 3 वर्षेांची झुंज अपयशी ठरली. वयाच्या अवघ्या 40 वर्षी उमद्या क्रिकेटपटूचं निधन झाल्याने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. हुसेन यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. (former bangladesh all rounder musharraf hossain dies at 40)
मुशर्रफची या वर्षाच्या सुरुवातीला प्रकृती खालावली होती. तसेच हुसैन यांच्यावर गेल्या वर्षी चेन्नई येथील रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. पण या वर्षाच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती खालावली.
त्यानंतर गेल्या महिन्यात त्यांना ढाका येथील खासगी रुग्णालायत दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र अखेर त्यांनी काल 19 एप्रिलला अखेरचा श्वास घेतला.
मुशर्रफ हुसैनने 2008 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध पदार्पण केले होते. तसेच त्यानंतर तब्बल 8 वर्षांनंतर 2016 मध्ये त्यांनी अफगाणिस्तानविरुद्ध दुसरा सामना खेळला होता. त्यांनी बांगलादेशसाठी एकूण 5 एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्यांनी 4 विकेट्स घेतल्या होत्या.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. "बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) बांगलादेशचे माजी खेळाडू मुशर्रफ हुसैन रुबेल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. मुशर्रफ हुसैन यांनी दोन दशकांच्या कारकिर्दीत सर्व फॉरमॅटमध्ये 550 हून अधिक विकेट घेतल्या. BCB मनापासून सहानुभूती आणि शोक व्यक्त करतो."