तुझ्यात असा कोणता गुण आहे जो सचिन, धोनी, विराटमध्ये नाही? गांगुलीने एका शब्दात दिलं उत्तर...

सौरव गांगुलीला भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणलं जातं. सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) भारतासाठी खेळताना अनेक नवे रेकॉर्ड रचले होते. तसंच मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या साथीने भारतासाठी भक्कम फलंदाजी उभी केली होती.   

शिवराज यादव | Updated: Jan 16, 2024, 05:55 PM IST
तुझ्यात असा कोणता गुण आहे जो सचिन, धोनी, विराटमध्ये नाही? गांगुलीने एका शब्दात दिलं उत्तर... title=

Sourav Ganguly: बीसीसीआयचा (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुलीची (Saurav Ganguly) गणना भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. 1992 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलेल्या सौरव गांगुलीने आपल्या करिअरमध्ये 311 एकदिवसीय सामने, 113 कसोटी सामने खेळले असून अनुक्रमे 11 हजार 363 आणि 7212 धावा केल्या आहेत. आपल्या आक्रमक फलंदाजी आणि नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीने संघाला 2003 एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यापर्यंत नेलं होतं. पण अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. याशिवाय सौरवने भारताला देशाबाहेर कसोटी सामने जिंकण्याची सवय लावली. तसंच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या साथीने भारतासाठी भक्कम फलंदाजीक्रम उभा केला. 

दरम्यान सौरव गांगुलीने नुकतीच एका रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याला त्याचे माजी सहकारी खेळाडू सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याबद्दल विचारण्यात आलं. 

तुला सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यातील कोणते गुण घेण्यास आवडेल असा प्रश्न सौरवला विचारण्यात आला. त्यावर थोडा विचार करत त्याने उत्तर दिलं की, "सचिनची महानता, विराटचा आक्रमकपणा आणि धोनीचा संयमीपणा".

यानंतर सौरवला तुझ्यातील असा एक गुण जो सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यात नाही असं विचारण्यात आलं असता, त्याने 'तडजोड' असं उत्तर दिलं. सौरवच्या उत्तरावर प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून दाद दिली. 

याआधी सौरव गांगुलीने विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांना टी-20 वर्ल्डकप संघात सहभागी करुन घेण्याच्या निर्णयाला पाठिबा दिला होता. जून महिन्यात हा वर्ल्डकप पार पडणार आहे. "नक्कीच, रोहितने टी-20 वर्ल्डकप संघाचं नेतृत्व करावं. विराट कोहलीही संघात असावा. विराट कोहली एक उत्तम खेळाडू आहे. तो 14 महिन्यांनी टी 20 खेळत असला तरी त्याचा काही फरक पडणार नाही," असं सौरव म्हणाला.

सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ ऑक्टोबर 2022 ला संपुष्टात आला. 1983 वर्ल्डकप विजेत्या संघाचे खेळाडू रॉजर बिन्नी यांनी सौरवची जागा घेतली.