भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 73 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने जगभरातून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक देशांच्या प्रमुखांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये पाकिस्तानही होता. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली असून ती चांगलीच व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे त्याने नरेंद्र मोदींचा उल्लेख 'भारताचे गार्डियन' असा केला आहे. तसंच भारत जगाचं नेतृत्व करु शकतो हे सिद्ध केल्याचंही म्हटलं आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दिनेश कानेरियाने ही पोस्ट शेअर केला आहे. दरम्यान, त्याने ही पोस्ट शेअर केल्यानंतर एका भारतीय व्यक्तीने त्याला आमच्या अंतर्गत बाबतीत नाक खुपसू नको असं सुनावलं. त्यावर दिनेश कानेरियाने दिलेल्या उत्तराचंही कौतुक केलं जात आहे.
"भारताचे गार्डियन नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत देशाचं नेतृत्व करु शकतो हे नरेंद्र मोदींनी सिद्ध केलं आहे. आज संपूर्ण जग 'वसुधैव कुटुंबकम्' यावर बोलत आहे. मी प्रभू श्रीरामाकडे तुमच्या चांगल्या आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना करतो," असं दिनेश कानेरियाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पण दिनेश कानेरियाने केलेली ही पोस्ट काहींना आवडली नाही. पाकिस्तानचा खेळाडू भारताच्या पंतप्रधानांना शुभेच्छा देतो हे त्यांना रुचलं नाही. यातील एकाने दिनेश कानेरियावर टीका करत म्हटलं की "आमच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसू नका. आमच्या प्रिय पंतप्रधानांना कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीने एकही शब्द बोलावा अशी आमची इच्छा नाही".
दरम्यान या टीकेला दिनेश कानेरियाने उत्तर दिलं असून, त्याचं हे उत्तर नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं आहे. त्याने म्हटलं की, "काबूल ते कामरुप, गिलगिट ते रामेश्वरम, आपण सगळे एक आहोत. पण आता काहींना समजत नसेल तर काही करु शकत नाही".
दिनेश कानेरियाने दिलेलं हे उत्तर सोशल मीडिया युजर्सना प्रचंड आवडलं असून, त्यावर कमेंट्स करत आहेत. एकाने क्लीन बोल़्ड केलंस अशा शब्दांत कौतुक केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी त्यांचा 73 वा वाढदिवस साजरा केला. त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील द्वारका येथे आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि एक्सपो सेंटर (IICC) यशोभूमीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले.