अमरोहा : गेल्या काही दिवसांपासून पत्नीनं केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपानंतर क्रिकेटपटू मोहम्मद शमी वादात सापडला आहे. यानंतर आता शमीची पत्नी हसीन जहां, तिची मुलगी आणि वकिलाला घेऊन शमीच्या अमरोहाच्या घरी पोहोचली. अमरोहामध्ये पोहोचल्यावर हसीन जहांनं पोलीस स्टेशन गाठलं आणि सुरक्षेची मागणी केली. यानंतर पोलीस हसीन जहांला घेऊन शमीच्या घरी पोहोचली पण घराला कुलुप होतं. घराला कुलुप असल्यामुळे हसीन जहां शमीच्या काकाच्या घरी गेले होते. हसीन जहां अमरोहाला पोहोचल्याचं कळल्यावर शमीचे कुटुंबिय फरार झाल्याचं बोललं जात आहे. हसीन जहां सध्या शमीच्या काकांच्या घरी थांबली आहे.
शमीचं कुटुंबिय कुलुप लावून निघून गेल्यामुळे मुलीला उन्हामध्ये उभं राहावं लागल्याचा आरोप हसीन जहांनं केला आहे. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचं नातं वाचवायचं आहे. फक्त शमीला त्याच्या चुकीची जाणीव व्हायला पाहिजे, असं हसीन जहां म्हणाली आहे.
शमीनं माझी माफी मागितली तर मी त्याला माफ करेन आणि पुन्हा आम्ही एकत्र येऊ. पण शमीनं जे काम केलं आहे ते चूक आहे. शमीनं माफी मागण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया हसीन जहांनं दिली. हसीन जहां तिची मुलगी आणि वकिलासोबत कोलकात्याहून अमरोहाला आली आहे. हसीनच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस तैनात करण्यात आली आहे. शमीचा मोठा भाऊ गुन्हेगार आहे. त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. शमीच्या भावाला स्वत:च्या मेव्हणीशी शमीचं लग्न लावायचं आहे. यासाठी तो माझा खूनही करू शकतो, असा आरोप हसीन जहांनं लगावला आहे.