मुंबई : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने ICC T20 क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तो आता नंबर वन बॅट्समन होण्याच्या खूप जवळ आहे. वर्षभरापूर्वी T20I मध्ये पदार्पण करणाऱ्या 31 वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाज सूर्यकुमारने आता दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तो आता पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमपेक्षा (Babar azam) फक्त दोन गुणांनी मागे आहे.
ICC रँकिंगमध्ये त्याने नुकत्याच केलेल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध शतक झळकावणाऱ्या या भारतीय फलंदाजाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातही मॅचविनिंग इनिंग खेळली. या सामन्यात त्याने डावाची सुरुवात करताना 44 चेंडूत 76 धावा केल्या.
सूर्याला तीन स्थानांचा फायदा
आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत सुर्याने तीन स्थानांनी झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याचे आता 816 रेटिंग गुण आहेत, तर बाबर आझमचे 818 गुण आहेत. या यादीत पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान तिसऱ्या स्थानावर आहे, त्याचे 794 गुण आहेत. टॉप 10 मध्ये सूर्यकुमार हा एकमेव भारतीय आहे.
बाबरला मागे टाकण्याची संधी
भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध अजून दोन T20 सामने खेळायचे आहेत आणि जर सूर्यकुमारने या कालावधीत आपला फॉर्म कायम ठेवला तर तो बाबरला मागे टाकून या महिन्यात प्रथम क्रमांकावर विराजमान होऊ शकतो.
सूर्याच्या या वर्षातील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत आणि त्यादरम्यान त्याने 40.40 च्या सरासरीने आणि 190.56 च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने 404 धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्या बॅटने 40 चौकार आणि 23 षटकारही मारले.
T20 विश्वचषकासाठी निवड जवळपास निश्चित
सूर्यकुमार हा आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. त्याची अलीकडची कामगिरी लक्षात घेता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी त्याची निवड जवळपास निश्चित आहे.