Corona : टी-२० वर्ल्ड कपही पुढे ढकलला जाण्याची शक्यता

कोरोना व्हायसरने जगभरात थैमान घातल्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Updated: Mar 31, 2020, 11:24 PM IST
Corona : टी-२० वर्ल्ड कपही पुढे ढकलला जाण्याची शक्यता title=

मुंबई : कोरोना व्हायसरने जगभरात थैमान घातल्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. टोकयोमध्ये यंदाच्या वर्षी होणारं ऑलिम्पिक पुढच्या वर्षी होणार आहे. तर २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पण सध्याची भारतातली परिस्थिती पाहता १५ एप्रिलपासूनही आयपीएल सुरू होणं अशक्य आहे. त्यातच आता टी-२० वर्ल्ड कपवरही संकट ओढावलं आहे.

यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप २ वर्षांनी व्हायची शक्यता आहे. २०२१ साली वेळ नसल्यामुळे थेट २०२२ सालीच टी-२० वर्ल्ड कप होऊ शकतो. कोरोना व्हायरसमुळे खेळाडूही सध्या घरामध्येच आहेत.

'टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलण्याबाबत चर्चा झाली, पण मग ही स्पर्धा कधी घ्यायची हा प्रश्न आहे. डिसेंबर महिन्यात भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर लगेच बीग बॅश लीग आणि मग एप्रिलमध्ये आयपीएल खेळवली जाईल. मार्चमध्ये वेळ असला तरी प्रसारण करणारी कंपनी लागोपाठ टी-२० स्पर्धेसाठी तयार होणार नाहीत,' अशी माहिती सूत्रांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली.

'२०२१ सालचा टी-२० वर्ल्ड कप भारतात होणार आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप २०२२ साली खेळवण्याशिवाय पर्याय नाही,' असंही सूत्राने सांगितलं.

महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीने वेळापत्रकानुसार वर्ल्ड कप होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसंच जगभरात पसरत असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं आयसीसीने सांगितलं होतं.