मुंबई : भारतात यंदा टी-20 वर्ल्डकपचं आयोजन होणार आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे भारतात त्याच्यावर टांगती तलवार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे की, कोविड संकट नियंत्रणात आणण्यात भारत अपयशी ठरल्यास संयुक्त अरब अमिराती यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होऊ शकते..
18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 वर्ल्डकपचे आयोजन भारत करणार आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गाच्या दुसर्या लाटेत भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारतात टी-20 वर्ल्डकपचं आयोजन करता येईल का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
बीबीसीआयचे महाव्यवस्थापक धीरज मल्होत्रा म्हणाले की, 'भारतीय क्रिकेट मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारताने अजून आशा सोडली नाही. मला नुकतेच या स्पर्धेचे संचालक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामुळे भारतात याचं आयोजन करता येईल का हे सुनिश्चित करण्यासाठी मी सर्व काही करत आहे. आम्ही सर्वात वाईट परस्थिती आणि सामान्य परिस्थिती याबाबत विचार करत आहोत. आम्ही सतत आयसीसी सोबत बोलत आहोत.'
मल्होत्रांनी म्हटल की, जर देशातील अभूतपूर्व आरोग्याच्या संकट कायम राहिले तर बीसीसीआय ही स्पर्धा भारताबाहेर खेळवण्याचा निर्णय घेईल. युएई हे एक आदर्श ठिकाण ठरेल.
डेली मेलच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) भारताच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. आयसीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्योफ अलार्डिस म्हणाले की, यावर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी या प्रशासकीय समितीची बॅकअप योजना आहे. स्पर्धा कोठे करायची ही येणारी वेळ निश्चित करेल.'