...तर तरुणांना संधी देऊ, निवड समितीचा ज्येष्ठ खेळाडूंना अल्टिमेटम

इंग्लंड दौऱ्यात वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय टीमवर टीकेची झोड उठत आहे.

Updated: Sep 16, 2018, 04:46 PM IST
...तर तरुणांना संधी देऊ, निवड समितीचा ज्येष्ठ खेळाडूंना अल्टिमेटम title=

मुंबई : इंग्लंड दौऱ्यात वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय टीमवर टीकेची झोड उठत आहे. ३ मॅचच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा १-२नं पराभव झाला तर ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-४नं पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर विराट कोहलीचं कर्णधारपद, रवी शास्त्रीचं प्रशिक्षण, निवड समितीनं निवडलेले खेळाडू आणि खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आता निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही ज्येष्ठ खेळाडूंना इशारा दिला आहे. एवढ्या संधी मिळूनही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही तर नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असं एमएसके प्रसाद म्हणाले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेट आणि भारत ए कडून खेळणाऱ्या खेळाडूंवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं वक्तव्य प्रसाद यांनी केलं आहे. जे खेळाडू चांगली कामगिरी करतायत त्यांना निश्चित संधी दिली जाईल, असं आश्वासन प्रसाद यांनी दिलं.

मयंक अग्रवालला संधी का नाही?

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मयंक अग्रवालनं खोऱ्यानं रन काढल्या आहेत. तरी त्याला अजूनही संधी का देण्यात आली नाही, असा सवाल प्रसाद यांना विचारण्यात आला. तेव्हा आमचं त्याच्याकडेही लक्ष आहे. लवकरच त्याला या कामगिरीचं इनाम मिळेल, असं प्रसाद म्हणाले.

भारतानं या वर्षी परदेशात ६ टेस्ट मॅच गमावल्या आहेत. पण मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मात्र सध्याची भारतीय टीम परदेश दौरा करणारी मागच्या १५-२० वर्षातली सर्वोत्तम टीम वाटत आहे. भारतीय टीम आता डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर असणार नाहीत. त्यामुळे या दौऱ्यामध्ये कोहलीच्या टीमला चांगली कामगिरी करण्याची संधी आहे.

विराटसोडून सगळे बॅट्समन अपयशी

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये कर्णधार विराट कोहली वगळता एकाही भारतीय बॅट्समनना चमकदार कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीनं ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये २ शतक आणि ३ अर्धशतकांच्या मदतीनं ५९३ रन केले. सीरिजमध्ये लोकेश राहुल भारताचा दुसरा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. राहुलनं सीरिजमध्ये २९९ रन केले. पण यातले १४९ रन शेवटच्या इनिंगमधलेच होते.

टीम निवडीमध्ये चूक

काऊंटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे पहिल्या टेस्टमधून चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आलं. ही टेस्ट भारतानं ३१ रननं गमावली होती. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये ढगाळ वातावरण असतानाही भारतानं अश्विन आणि कुलदीप यादव या दोन स्पिनरला टीममध्ये घेतलं. याचबरोबर हार्दिक पांड्यालाही या सीरिजमध्ये बॅटनं कमाल करता आली नाही. मुरली विजय आणि शिखर धवन हे भारतीय ओपनर संपूर्ण सीरिजमध्ये अपयशी ठरले. पण मुरली विजयला पहिल्या तीन टेस्ट मॅचनंतर वगळण्यात आलं. पण शिखर धवनवर मात्र निवड समिती आणि कोहली-शास्त्रीनं विश्वास ठेवला.