वर्ल्ड कप पराभवासाठी विराटला जबाबदार धरणारा 'तो' कोण?

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून धक्कादायक पराभव झाला.

Updated: Sep 23, 2019, 01:34 PM IST
वर्ल्ड कप पराभवासाठी विराटला जबाबदार धरणारा 'तो' कोण? title=

मुंबई : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून धक्कादायक पराभव झाला. या धक्क्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली प्रशासकीय समिती टीम इंडियाच्या पराभवाची कारणं शोधेल आणि संबंधितांशी चर्चा करेल, असं सांगण्यात आलं होतं. यानंतर आता प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी वर्ल्ड कप पराभवानंतर काय चर्चा झाली याबाबत माहिती दिली आहे.

'वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर बंद दाराआड अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये पराभवासाठी विराटला कोणीही जबाबदार धरलं नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण जेव्हा टीम खराब कामगिरी करते, तेव्हा फक्त कर्णधार जबाबदार नसतो,' असं विनोद राय म्हणाले आहेत.

'टीम जेव्हा खराब कामगिरी करते तेव्हा त्याचं आत्मचिंतन करणं योग्य असतं. पण ही काही फक्त कर्णधाराची जबाबदारी नाही,' असं वक्तव्य विनोद राय यांनी केलं आहे.

२०१५ साली वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या टीमलाही भारताने पराभूत केलं होतं. यानंतर न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात झालेली फायनल टाय झाली, यानंतर झालेली सुपर ओव्हरही टाय झाल्यामुळे अखेर इंग्लंडने जास्त बाऊंड्री मारल्यामुळे त्यांना विजेता घोषित करण्यात आलं.

वर्ल्ड कपच्या पराभवानंतर लगेचच वेस्ट इंडिज दौरा असल्यामुळे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार ४५ दिवसांनी वाढवण्यात आला. यानंतर पुढे कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. विराट कोहलीनेही रवी शास्त्री पुन्हा प्रशिक्षक झाले तर आनंद होईल, असं वक्तव्य केलं होतं. रवी शास्त्री यांना टॉम मुडी आणि माईक हेसन यांच्याकडून स्पर्धा होती.

रवी शास्त्री यांच्याबरोबरच बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण आणि फिल्डिंग प्रशिक्षक भरत अरुण यांचा करारही वाढवण्यात आला. पण संजय बांगर यांच्याऐवजी विक्रम राठोड यांची बॅटिंग प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाला चौथ्या क्रमांकासाठी सक्षम बॅट्समन न सापडल्यामुळे बांगर यांची गच्छंती झाल्याचं बोललं गेलं.