IND vs NZ: इशांत शर्माकडून झहीर खानच्या रेकॉर्डची बरोबरी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली.

Updated: Feb 23, 2020, 06:22 PM IST
IND vs NZ: इशांत शर्माकडून झहीर खानच्या रेकॉर्डची बरोबरी

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली. तिसऱ्या दिवसाअखेरीस दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा स्कोअर १४४/४ असा आहे. भारतीय टीम अजूनही ३९ रननी पिछाडीवर आहे. अजिंक्य रहाणे २५ रनवर नाबाद आणि हनुमा विहारी १५ रनवर नाबाद खेळत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा १६५ रनवर ऑलआऊट झाल्यानंतर न्यूझीलंडने ३४८ रन केले. 

इशांत शर्माने शानदार बॉलिंग करत किवींच्या ५ खेळाडूंना माघारी धाडलं. तर अश्विनला ३ आणि शमी-बुमराहला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. इशांत शर्माने ११व्यांदा टेस्ट क्रिकेटमध्ये ५ विकेट घेतल्या. याचसोबत इशांतने झहीर खानच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.

इशांतने दुसऱ्या दिवशी टॉम लेथम, टॉम ब्लंडेल आणि रॉस टेलरची विकेट घेतली. यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्टला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. इशांत शर्माच्या टेस्ट क्रिकेटमध्ये २९७ विकेट झाल्या आहेत. इंग्लंडच्या डॅरेक अंडरवूडसोबत इशांतने बरोबरी केली आहे. अंडरवूडने ८६ टेस्टमध्ये २९७ विकेट घेतल्या होत्या. 

याआधीच्या टेस्ट मॅचमध्येही इशांतने इनिंगमध्ये ५ विकेट घेतल्या. बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट टेस्टमध्ये इशांतने पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट घेतल्या होत्या. कोलकात्यामध्ये झालेल्या या मॅचमध्ये इशांतने एकूण ९ विकेट घेतल्या. त्यानंतर आता न्यूझीलंडमध्येही इशांतने पहिल्याच इनिंगमध्ये ५ बळी मिळवले. लागोपाठ २ टेस्ट मॅचच्या इनिंगमध्ये इशांतने ही कामगिरी केली आहे.