कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 291 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी केली आणि त्याने शानदार शतक झळकावलं. मात्र टीम साऊथीने 105 रन्सवर श्रेयसला माघारी धाडलं.
श्रेयसने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला होता. विराट कोहलीला पहिल्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. पुढील कसोटी सामन्यात तो टीम इंडियाचा कर्णधार म्हणून सामील होणार आहे.
श्रेयस अय्यरला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आहे. त्यामुळे आता खराब फॉर्ममुळे टीम इंडियाबाहेर जाण्याच्या जवळ असलेल्या अजिंक्य रहाणेसाठी श्रेयस अय्यरने या खेळीने धोका निर्माण केला आहे.
शुभमन गिलनेही चमकदार कामगिरी करत कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी 52 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा (88 चेंडूत 26) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (63 चेंडूत 35) चांगली सुरुवात करूनही मोठी खेळी खेळू शकले नाहीत. तर सलामीवीर मयंक अग्रवाल (28 चेंडूत 13) संधीचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कमान अजिंक्य रहाणेच्या हाती आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी 'किंग कोहलीला' विश्रांती देण्यात आली आहे. तो मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत सहभागी होणार आहे.