टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! न्यूझीलंडने पहिल्याच मॅचमध्ये दिला धक्का, WTC Final चं समीकरण बदललं

न्यूझीलंडने बंगळुरू टेस्टच्या पाचव्या दिवशी भारतावर 8 विकेट्सने विजय मिळवला असून यासह भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकण्याचा 36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.

पुजा पवार | Updated: Oct 20, 2024, 01:18 PM IST
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! न्यूझीलंडने पहिल्याच मॅचमध्ये दिला धक्का, WTC Final चं समीकरण बदललं title=
(Photo Credit : Social Media)

IND VS NZ 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील बंगळुरूमध्ये खेळवण्यात आलेला पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला. न्यूझीलंडने बंगळुरू टेस्टच्या पाचव्या दिवशी भारतावर 8 विकेट्सने विजय मिळवला असून यासह भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकण्याचा 36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. मात्र यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला त्यांचं WTC फायनलचं (WTC Final) तिकिट धोक्यात आलेलं आहे. 

WTC Final चं तिकीट धोक्यात?

टीम इंडियाने बांगलादेशला टेस्ट सीरिजमध्ये क्लीन स्वीप देऊन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये पहिलं स्थान पक्कं केलं होतं. त्यावेळी भारताच्या विजयाची टक्केवारी 74.24 टक्के होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी भारताला उर्वरित 8 टेस्ट सामन्यापैकी 4 टेस्ट सामने जिंकावे लागणार होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी भारताला न्यूझीलंड विरुद्ध 3 तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. यापैकी न्यूझीलंड सीरिज भारतात होणार असल्याने ती जिंकणं भारताला सहज शक्य होणार होतं. कारण ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर टेस्ट सीरिज खेळण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करावं लागणार आहे. 

न्यूझीलंड विरुद्ध तीनही सामने जिंकल्यास भारताचं WTC Final चं तिकीट जवळपास निश्चित झालं असतं. परंतू बंगळुरू टेस्टमध्ये तसं होऊ शकलं नाही. भारताने न्यूझीलंडला पहिला टेस्ट सामना जिंकण्यासाठी १०७ धावांचं आव्हान दिलं होतं. जे आव्हान न्यूझीलंडने 8 विकेट्स राखून पूर्ण केलं. यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या भारताची विजयाची टक्केवारी 68.06 वर आली आहे. 

हेही वाचा : VIDEO : भारत - पाकिस्तान सामन्यात फुल्ल राडा, बॉलरने अभिषेक शर्माला दाखवलं बोट, पुढे जे झालं ते...

 

भारताने 12 टेस्ट सामन्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला असून 3 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर एक सामना ड्रॉ झाला. न्यूझीलंड विरुद्ध पहिला टेस्ट सामना भारताने जिंकला असता तर त्यांची WTC फायनलमध्ये पोहोचण्याची टक्केवारी अजून वाढली असती. पण तसे झाले नाही. त्यामुळे भारताला आता   WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित 7 टेस्ट सामन्यांपैकी 4 सामने जिंकावे लागणार आहेत. जे कदाचित भारतासाठी तेवढं सोपं नसेल. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्टमध्ये काय काय घडलं? 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना हा 16 ते 20 ऑक्टोबर पर्यंत बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे खराब झाला, यामुळे टॉस सुद्धा होऊ शकला नाही. गुरुवारी दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचाही निर्णय टीम इंडियासाठी अयोग्य ठरला. कारण पहिल्याच इनिंगमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला 46  धावांवर ऑल आउट केले. दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तब्बल 402 धावांचा डोंगर उभा केला. यात न्यूझीलंडने 356 धावांची आघाडी घेतली होती. टीम इंडियाकडून रोहित शर्माने 52, विराट कोहलीने 70 , सरफराज खानने 150, ऋषभ पंतने 99 तर यशस्वी जयस्वालने 35 धावा करून न्यूझीलंडची आघाडी मोडीत काढली आणि न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले. पाचव्या दिवशी फक्त 2 विकेट्स गमावून न्यूझीलंडने विजयासाठीचं आव्हान पूर्ण केलं. 

भारताची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडची प्लेईंग 11 :

टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साउथी, एजाझ पटेल, विल्यम ओरूरके