मुंबई: पाकिस्तान विरुद्ध 10 विकेट्सने पराभव झाल्यानंतर आता दुसरा सामना किवी विरुद्ध आहे. या सामन्यात किवीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय किवीच्या पथ्यावर पडला. भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा लाजिरवाणी कामगिरी केली. टीम इंडियाने 20 ओवरमध्ये फक्त 110 धावा केल्या. या सामन्यातील भारतीय संघाच्या अपयशाला सर्वात मोठा जबाबदार विराट कोहली आहे अशी चर्चा आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीची एक चूक भोवली.
विराटच्या एका चुकीमुळे टीम इंडिया खूप मोठ्या कचाट्यात सापडली. आज न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाची टीम पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या प्रयोगामुळे टीम इंडियाला ही किंमत मोजावी लागली.
विराट कोहलीनं फलंदाजीची सगळी ऑर्डर बदलली. नेहमी ओपनींगला येणारा रोहित शर्मा आणि के एल राहुल ऐवजी यावेळी ईशान किशन-के एल राहुल मैदानात उतरले. तिसऱ्या स्थानावर विराट उतरायचा. त्या ऐवजी रोहित शर्मा उतरला. एवढ्या मोठ्या सामन्यात हा प्रयोग वापरणे टीम इंडियासाठी एकप्रकारे घातक ठरलं असं म्हणायला हवं.
या सामन्यात टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे बदलली. या सामन्यात जगातील सर्वोत्तम सलामीवीर मानला जाणारा रोहित शर्मा सलामीलाही आला नाही. रोहितच्या जागी केएल राहुलच्या जागी इशान किशनला खेळवण्यात आले. हा प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला असून इशान अवघ्या 4 धावा करून बाद झाला. तेव्हापासून संपूर्ण फलंदाजीचा क्रम उतरणीला लागला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला रोहित, सलामीवीर राहुल आणि कर्णधार विराट कोहली हे सर्व पूर्णपणे अपयशी ठरले.
या सामन्यात रोहित शर्मा, केएल राहुल, इशान किशन आणि कर्णधार विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप झाले. या सामन्यात राहुल अवघ्या 14 धावा करून बाद झाला. याशिवाय इशान किशनच्या बॅटमधून केवळ 4 धावा आल्या. त्याचवेळी रोहित शर्मा 14 धावा करून परतला आणि विराट कोहलीने एकूण 9 धावा केल्या. कोहलीच्या पाठोपाठ ऋषभ पंत 12 धावा करून बाद झाला.