close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर 'इतक्या' कोटींचे नुकसान

आजच्या सामन्यातही पाऊस पडल्यास प्रायोजकांसमोर मोठे संकट उभे राहू शकते. 

Updated: Jun 16, 2019, 01:27 PM IST
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर 'इतक्या' कोटींचे नुकसान

मँचेस्टर: विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. इंग्लंडच्या मँचेस्टर येथे होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. यापूर्वीही भारत आणि न्यूझीलंडमधील यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. मात्र, भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द होणे परवडणारे नाही. 

विश्वचषकातील हा हायव्होल्टेज सामना रद्द झाल्यास स्टार स्पोर्टसह प्रायोजक कंपन्यांचे तब्बल १५० कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. यापूर्वीच स्पर्धेतील चार सामने रद्द झाल्यामुळे स्टार स्पोर्टसचे १०० कोटींचे नुकसान झाले आहे. 

मात्र, आजच्या सामन्यातही पाऊस पडल्यास प्रायोजकांसमोर मोठे संकट उभे राहू शकते. या सामन्याची तिकीटे अवघ्या काही तासांमध्येच संपली होती. ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावरील २५ हजार तिकिटांसाठी ६ लाख लोकांनी अर्ज केले होते. मात्र, मोजक्याच लोकांना तिकीटे मिळू शकली होती. या तिकिटांची किंमत १७ ते ६२ हजारांच्या सांगितले जाते. 

या सामन्यादरम्यान कंपन्यांनी जाहिरातींच्या प्रसारणासाठी  १० सेकंदांसाठी तब्बल अडीच कोटी रुपये मोजले आहेत. एरवी जाहिरातीच्या इतक्याच स्लॉटसाठी १.६० कोटी रूपये आकारले जातात. मात्र, भारत-पाकिस्तान सामन्यामुळे आज जाहिरातींच्या स्लॉटला विशेष महत्त्व आहे. अनेक प्रायोजकांनी आपल्या बजेटचा निम्मा हिस्सा याच सामन्यासाठी राखून ठेवल्याचे समजते. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. 

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार भारत-पाकिस्तान सामन्यावर तब्बल १०० कोटींचा सट्टा लागला आहे. एवढेच नव्हे तर पावसावरही सट्टा लागला आहे. पावसाचा व्यत्यय न येता सामना पूर्ण खेळल्यास २० पैसे आणि पावसाचा व्यत्यय येऊन सामना रद्द झाल्यास पाच रुपये असा भाव शनिवारी सट्टाबाजारात खुला झाला.