'मी 64 धावा केल्या कारण...'; पराभवानंतर रोहितचं सूचक विधान चर्चेत; निशाण्यावर इंडियन मिडल ऑर्डर?

Rohit Sharma Slams Middle Order Batting Of Team India: भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यामध्ये चाहत्यांबरोबरच कर्णधारालाही निशार केल्याचं दिसत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 5, 2024, 09:44 AM IST
'मी 64 धावा केल्या कारण...'; पराभवानंतर रोहितचं सूचक विधान चर्चेत; निशाण्यावर इंडियन मिडल ऑर्डर? title=
पराभवानंतर रोहितचं विधान

Rohit Sharma Slams Middle Order Batting Of Team India: भारतीय संघाला श्रीलंकेच्या दौऱ्यामध्ये लय गवसत नसल्याचं रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पुन्हा अधोरेखित झालं. गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केल्यानंतरही फलंदाजांना साधं मैदानावर टिकून राहता न आल्याने भारताचा किरकोळ धावांचा पाठलाग करताना पराभव झाला. मालिकेतील पहिल्या सामन्यात हातातोंडाशी आलेला विजयाचा घास सामना अनिर्णित राहिल्याने हिरावला गेलेला असतनाच दुसऱ्या सामन्यात तर पाहुण्या संघाचा चक्क 32 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. रोहितने श्रीलंकेच्या संघाचं कौतुक करतानाच भारतीय संघातील फलंदाजांना सूचकपणे सुनावलं आहे. खास करुन मधल्या फळीतील फलंदाज तर केवळ मैदानात हजेरी लावून गेल्याप्रमाणे बाद झाल्यानंतर 65 धावांची खेळी करणाऱ्या रोहितने आपल्या खेळीमागील गुपीत सांगितलं. इतर फलंदाज अपयशी ठरत असताना आपण कशा धावा केल्या हे सांगितलं.

चांगली सुरुवात अन् मधल्या फळीकडून साफ निराशा

भारतीय संघासमोर 241 धावांचं आव्हान असताना भारताने उत्तम सुरुवात केली. स्वत: कर्णधार रोहित शर्मा आणि शुमन गिलने आपल्या खास शैलीत धडाकेबाज सुरुवात संघाला करुन दिली. दोघांनी बिनबाद 97 धावांची पार्टनरशीप केली. यापैकी 65 धावा एकट्या रोहितने केल्या. 14 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर रोहित बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाला गळतीच लागली. रोहितनंतर संघाच्या धावसंख्येत 19 ची भर पडल्यावर 18 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर शुभमन 35 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर त्याच ओव्हरमध्ये शिवम दुबे भोपळाही न फोडता बाद झाला. दोन ओव्हरनंतर विराट 14 धावा करुन तंबूत परतला. अक्षर पटेल वगळता मधल्या फळीतील सर्वच फलंदाजांनी भारतीय चाहत्यांची साफ निराशा केली.

श्रेयस अय्यर 7 धावांवर बाद झाला तर के. एल. राहुल दुसऱ्याच चेंडूवर भोपळाही न फोडता तंबूत परतला. वॉशिंग्टन सुंदरने सामना वाचवण्यासाठी अक्षर पटेलबरोबर भागिदारी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो सुद्धा 40 बॉलमध्ये 15 धावा करुन तंबूत परतला. मोहम्मद सिराजने 4 आणि अर्शदीपने 3 धावांची भर घातली. तर कुलदीप 27 बॉलमध्ये 7 धावा करुन नाबाद राहिला. भारताच्या सहा फंलदाजांना वैयक्तिक दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. भारतीय संघाचा डाव 43 व्या ओव्हरमध्ये 208 धावांवर आटोपला. 

नक्की वाचा >> कोहलीमुळे मैदानात 'विराट' राडा! हेल्मेट आपटलं; जयसूर्यानेही श्रीलंकन ड्रेसिंग रुममधून...

फलंदाजीच्या कामगिरीवर ठेवलं बोट

सामन्यानंतर रोहितने संघाच्या मिटींगमध्ये नक्कीच मधल्या फळीतीली फलंदाजांच्या कामगिरीबद्दल चर्चा होईल असं पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं. इतक्यावर न थांबता रोहितने अप्रत्यक्षपणे संघातील सहकाऱ्यांना श्रीलंकेत कशापद्धतीने फलंदाजी केली पाहिजे हे सुद्धा सांगितलं. "मी 64 धावा करु शकलो यामागील कारण म्हणजे मी त्या दृष्टीकोनातून फलंदाजी केली. मी अशापद्धतीने फलंदाजी करतो तेव्हा मी फार धोके पत्कारतो. तुम्ही तिरके फटके मारले नाहीत तर तुम्ही कायम निराशच व्हाल," असं म्हणत रोहितने सूचक पद्धतीने संघ सहकाऱ्यांच्या फलंदाजीमधील कामगिरीवर बोट ठेवलं.

नक्की वाचा >> Ind vs SL: 'तुमच्यासमोर जे काही..', पराभवानंतर रोहित स्पष्टच बोलला; 'तो' अंदाज चुकल्याची कबुली

जास्तीत जास्त धावा इथे करता येतील

"मला माझ्या सध्याच्या भूमिकेमध्ये कोणतीही तडजोड करण्याची इच्छा नाही. आम्हाला या खेळपट्टीचा गुणधर्म कळला आहे. मधल्या ओव्हरमध्ये खेळपट्टी खेळण्यासाठी फारच आव्हानात्मक होते. त्यामुळे तुम्ही पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा केल्या पाहिजे," असं रोहित म्हणाला.