मुंबई : भारतीय क्रिकेट टीम सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून पाच सामन्यांची T20 मालिका खेळवली जातेय. यामध्ये सूर्यकुमार यादव भारतीय टीमचा सलामीवीर रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसला. याआधी इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत ऋषभ पंतलाही रोहितसोबत ओपनिंग करण्याची संधी मिळाली होती आणि आता सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत ओपनिंग करताना दिसतोय.
दरम्यान सुर्यकुमार ओपनिंग करत असल्यावरून अनेकांनी याबाबत प्रश्न उपस्थित होते. मात्र यावर आता कर्णधार रोहित शर्मा पुढे सरसावलाय. या प्रश्नांना आता कर्णधाराने सडेतोड उत्तर दिलं आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, "खेळाडूने कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करावी अशी आमची इच्छा आहे. त्याने कोणत्याही विशिष्ट क्रमांकावर फलंदाजी करत रहावं, असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला खेळाडू फ्लेक्जिबल हवे आहेत. याचे दोन दृष्टीकोन आहेत आणि ते खेळाडूंवर अवलंबून आहे. खेळाडूंनी कोणत्याही पोझिशनमध्ये येऊन फलंदाजी करावी अशी आमची इच्छा आहे."
या प्रकारावर बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी भारतीय टीम मॅनेजमेंटला प्रश्न विचारला होता. अशाप्रकारे सूर्यकुमार यादवसारख्या सक्षम फलंदाजाची कारकिर्द धोक्यात येईल यावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र आता भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माने यावर मौन तोडत प्रतिक्रिया दिलीये.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने खेळले गेलेत. या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने पहिल्या टी-20मध्ये 24 आणि दुसऱ्या सामन्यात 11 रन्स केले. दरम्यान त्याला ओपनिंगला उतरवल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.