जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताची पहिली इनिंग १८७ रन्सवर ऑल आऊट झाली आहे. टॉस जिंकून भारतानं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण ओपनिंगला आलेला के.एल.राहुल शून्य रन्सवर आणि मुरली विजय ८ रन्सवर आऊट झाला.
पहिल्या दोन विकेट झटपट गेल्यानंतर पुजारा आणि कोहलीनं भारताचा डाव सावरायला सुरुवात केली. पुजारा आणि कोहलीनं अर्धशतक केलं पण मोठा स्कोअर करण्यात दोघांनाही अपयश आलं. पण या सगळ्यामध्ये चेतेश्वर पुजाराच्या नावावर एक लाजिरवाणं रेकॉर्ड झालं आहे. ५३ बॉल्स खेळल्यावर चेतेश्वर पुजाराला पहिली रन काढता आली. या दोघांची विकेट पडल्यावर मात्र भारताची बॅटिंग गडगडली.
टीममध्ये पुनरागमन करणारा अजिंक्य रहाणे ९ रन्स करुन आऊट झाला. भुवनेश्वर कुमारनं मात्र ३० रन्स करुन भारताचा स्कोअर वाढवण्यास मदत केली. लोकेश राहुल, हार्दिक पांड्या आणि इशांत शर्मा हे तीन खेळाडू या इनिंगमध्ये शून्य रन्सवर आऊट झाले.
दक्षिण आफ्रिकेच्या कागीसो रबाडाला ३, मॉर्कल, फिलँडर आणि पेहलुक्वायोला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या. एनगिडीला एक विकेट घेण्यात यश आलं. केप टाऊन आणि सेंच्युरिअन टेस्टमध्ये भारताचा पराभव झाल्यामुळे भारतानं ही सीरिज आधीच गमावली आहे.