Team India : भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी गेल्या काही सामन्यांपासून उंचावलेली पाहायला मिळत आहे. कॉमनवेल्थमधील महत्त्वपूर्ण कामगिरीनंतर आता भारतीय संघ इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याआधीच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारतीय महिला संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
नुकतीच झुलन गोस्वीमीची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला वनडे संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या दोन आठवड्यांच्या दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान ती तीन टी-20 सामने आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळणार आहे.
झुलन गोस्वामी 24 सप्टेंबर रोजी लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध तिचा शेवटचा सामना खेळणार आहे. झुलन गोस्वामी महिला वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. त्याचबरोबर महिला एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. झुलन गोस्वामीने या वर्षी मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात पहिल्यांदा टी-20 मालिका आणि नंतर एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. टी-20 मालिकेतील सामने (10 सप्टेंबर), डर्बी (13 सप्टेंबर) आणि ब्रिस्टल (15 सप्टेंबर) रोजी खेळवले जातील. तर एकदिवसीय सामने होव्ह (18 सप्टेंबर), कॅंटरबरी (21 सप्टेंबर) आणि लॉर्ड्स (24 सप्टेंबर) येथे खेळवले जातील.
झुलन गोस्वामीची कारकीर्द
झुलन गोस्वामी ही जगातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. झुलन गोस्वामीने टीम इंडियासाठी आतापर्यंत 12 टेस्ट मॅचमध्ये 44 विकेट घेतल्या आहेत. त्याने भारतासाठी 201 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर 252 विकेट्स आहेत. दुसरीकडे, झुलन गोस्वामीने 68 टी-20 सामन्यात 56 विकेट घेतल्या आहेत.