T20 World Cup 2021 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द होणार? पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास विरोध

भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच रद्द करण्याची मागणी केली जात आहे  

Updated: Oct 18, 2021, 09:35 PM IST
T20 World Cup 2021 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द होणार? पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास विरोध

मुंबई : T20 विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 World Cup) येत्या 24 ऑक्टोबरला पुन्हा एकदा भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात क्रिकेट वॉर रंगणार आहे. मात्र पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले वाढल्यानं पाकिस्तान विरोधात प्रचंड रोष पसरला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच रद्द (Ind vs Pak T20 Match) करण्याची मागणी केली जात आहे.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत दहशतवादी हल्ले वाढले आहेत. या दहशतवाद्यांना सीमेपलीकडून पाठिंबा मिळतोय तो पाकिस्तानचा. दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक जवान शहीद झाल्यानं पाकिस्तानविरोधात रोष वाढला आहे. एकीकडे काश्मीर सीमेवर पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या मदतीनं छुपं युद्ध छेडलं आहे. 

तर दुसरीकडं येत्या 24 ऑक्टोबरला दुबईत T20 क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांना भिडणार आहेत. मात्र दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये असं सोशल मीडियावर जोरदार ट्रेंडिंग झालं. त्यानंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही विरोध केलाय. शिवसेनेनं देखील पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास कडाडून विरोध केला आहे.

तसं पाहिलं तर दहशतवादाचा चेहरा बनलेल्या पाकिस्तानशी गेल्या 9 वर्षांपासून भारतानं क्रिकेट खेळणं बंद केलं आहे. डिसेंबर 2012 नंतर भारत-पाकिस्तानदरम्यान, एकही क्रिकेट सिरीज खेळली गेलेली नाही. डिसेंबर 2012 मध्ये पाकिस्तानी टीम भारतात आली होती, त्यावेळी शेवटचा सामना खेळला गेला होता. 2006 नंतर भारतीय टीम पाकिस्तान दौऱ्यावर गेलेली नाही. 2008 मध्ये दोन्ही देशांमध्ये शेवटचा कसोटी सामना झाला होता. त्यानंतर क्रिकेट वर्ल्ड कपचा अपवाद वगळता भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आलेले नाहीत.

केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांनी पाकिस्तानशी क्रिकेट खेळणं सोडून दिलं आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड टीमनं अलिकडेच पाकिस्तान दौरा रद्द केला. मार्च 2009 मध्ये दहशतवाद्यांनी श्रीलंका टीमवरच हल्ला केला होता. दुर्दैवाची बाब म्हणजे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू असलेल्या इम्रान खानच्या हाती सध्या पाकिस्तानची कमान आहे. मात्र बॅट आणि बॉल सोडून आता इम्रान खान बंदुका आणि बॉम्बची भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळंच क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तान एकाकी पडलाय.