Gautam Gambhir Effect On Team India Selection: भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षक पद गौतम गंभीरने स्वीकारल्याचा सर्वात मोठा फायदा इंडियन प्रिमिअर लिगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या खेळाडूंना झाल्याचं दिसत आहे. गौतम गंभीर मेंटॉर असताना यंदाचं आयपीएल कोलकात्याने जिंकलं. त्यामुळेच भारतीय संघात कोलकात्याच्या संघातील खेळाडूंचा दबदाबा वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांच्या संघांकडे पाहिल्याचं हे भाकित खरं ठरल्याचं दिसतं. विशेष म्हणजे एकदिवसीय सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या संघात एक असा खेळाडू आहे त्याच्याबरोबर भारतीय क्रिकेट नियाम मंडळाने साधं कंत्राटही केलेलं नाही. मात्र गंभीरच्या दबावामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ 29 जून रोजी भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला त्याच दिवशी संपला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबरच द्रविडचा करार टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेपर्यंतच होता. यानंतर 9 जुलै रोजी बीसीसीआयचे सचीव जय शाह यांनी पुढील पाच वर्षांसाठी कोलकाता नाईट रायडर्सला 2024 चं आयपीएलचं जेतेपद जिंकवून देणारा गौतम गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक असेल असं जाहीर केलं. गंभीरच्या हाती संघाचं प्रशिक्षकपद गेल्याने अनेक महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. त्यातही काही खेळाडूंसाठी गौतमच्या नियुक्तीबरोबरच 'अच्छे दिन' येणार असं मानलं गेलं आणि ते खरंही झालं आहे. विशेष बाब म्हणजे संध्या संघात स्थान देण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये एक खेळाडू असा आहे ज्याने थेट बीसीसीआयशी पंगा घेतल्याने तो संघाबाहेर होता. मात्र आता त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे.
गंभीरच्या सांगण्यावरुन ज्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं त्यामध्ये सर्वात आघाडीवर श्रेयस अय्यरचं नाव घेतलं जात आहे. केकेआरला जेतेपद पटकावून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरची संघातील एन्ट्री निश्चित मानली जात होती आणि घडलंही तेच! श्रेयस श्रीलंकन दौऱ्यामध्ये भारतीय एकदिवसीय संघाचा भाग आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला बासीसीआयने खेळाडूंबरोबर केलेल्या केंद्रीय करार झालेल्या खेळाडूंच्या यादीत श्रेयस नाव नाहीये. म्हणजेच सध्या श्रेयस हा बोर्डाबरोबर करारबद्ध खेळाडू नाहीये. मात्र असं असतानाही गंभीरची नियुक्ती झाल्यानंतर श्रेयस संघात येईल हे ठाम होतं. श्रेयसची निवड म्हणजे बीसीसीआयने गंभीरच्या हट्टापुढे नमतं घेतल्याचे संकेत असल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा >> Explained: T-20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हार्दिकला उपकर्णधारपदावरुन का काढलं? गिलची वर्णी कशी लागली?
गौतम गंभीरने निवड समितीच्या सदस्यांबरोबर काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये काही खेळाडूंसंदर्भात आग्रही भूमिका समितीकडे मांडल्याचं वृत्त 'टेलीग्राफ इंडिया'ने दिलं होतं. गंभीरने काही खेळाडूंना भारतीय संघाच्या जर्सीत पाहण्याची आपली इच्छा समितीला बोलून दाखवली होती. यामध्ये श्रेयस अय्यरचाही समावेश होता. त्याचप्रमाणे केकेआरशी संबंधित इतरही काही खेळाडूंना लॉटरी लागू शकते असं म्हटलं जात होतं आणि भारताच्या दोन्ही संघाकडे पाहिल्यास हे खरं ठरल्याचं दिसतं. गंभीर प्रमाणेच केकेआरकडून खेळणारा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचं सिलेक्शन एकदिवसीय संघात झालं आहे. त्याचप्रमाणे रिंकू सिंहलाही टी-20 संघात स्थान मिळालं आहे.
रोहित शर्मा (कर्णधार)
शुभमन गिल (उपकर्णधार)
विराट कोहली
के. एल. राहुल (विकेटकीपर)
ऋषभ पंत (विकेटकीपर)
श्रेयस अय्यर
रियान पराग
शिवम दुबे
कुलदीप यादव,
वॉशिंग्टन सुंदर
अक्षर पटेल
मोहम्मद सिराज
अर्शदीप सिंग
खलील अहमद
हर्षित राणा