हैदराबाद : ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या पहिल्या वनडे मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने विजय झाला. केदार जाधव-महेंद्रसिंह धोनी या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. या विजयासोबतच भारताने ५ मॅचच्या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी १४१ रनची नाबाद विजयी भागीदारी झाली. केदार आणि धोनी यांनी नॉटआऊट ८१ आणि ५९ रन काढल्या.
धोनीच्या ५९ रनच्या खेळीत १ सिक्सचा समावेश होता. या सिक्समुळे त्याच्या नावे एक विक्रम झाला आहे. भारताकडून सर्वाधिक सिक्स लगावण्याचा विक्रम त्याच्या नावे झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी दिलेल्या २३७ रनचे आव्हानाचे पाठलाग करताना धोनीने मॅचच्या ३७ व्या ओव्हर मध्ये कुल्टर नाईलच्या बॉलिगंवर सिक्स मारला. या सिक्ससोबतच तो भारताकडून सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू ठरला आहे. धोनीच्या नावे आता २१६ सिक्स आहेत. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितच्या नावे २१५ सिक्सची नोंद आहे.
धोनीचा अपवाद वगळता वनडे मध्ये अधिक सिक्स मारण्याचा यादीत काही भारतीय खेळाडूंचा समावेश होतो. यात प्रामुख्याने सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, युवराज सिंह आणि वीरेंद्र सेहवाग यांचा उल्लेख करावा लागेल.
महेंद्रसिंह धोनी- २१६ सिक्स
रोहित शर्मा - २१५ सिक्स
सचिन तेंडुलकर - १९५ सिक्स
सौरभ गांगुली - १८९ सिक्स
युवराज सिंह - १५३ सिक्स
क्रिकेट विश्वात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम हा शाहिद आफ्रिदीच्या नावे आहे. आफ्रिदीने ३५१ सिक्स लगावले आहेत. यासोबतच तो सिक्स मारण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेल याचा नंबर लागतो. गेलच्या नावे ३०२ सिक्सची नोंद आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी ऑलराऊंडर सनथ जयसूर्याचा नंबर लागतो. त्याने २७० सिक्स लगावले आहेत.