चेतेश्वर पुजाराच्या संथ खेळीवर रिकी पॉटिंगचं प्रश्नचिन्ह

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये चेतेश्वर पुजारानं शतक झळकावलं.

Updated: Dec 27, 2018, 07:15 PM IST
चेतेश्वर पुजाराच्या संथ खेळीवर रिकी पॉटिंगचं प्रश्नचिन्ह

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये चेतेश्वर पुजारानं शतक झळकावलं. पण ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉटिंगनं त्याच्या या खेळीवर आक्षेप घेतले आहेत. चेतेश्वर पुजाराच्या संथ खेळीमुळे मेलबर्नसारख्या पाटा विकेटवर भारताला जिंकणं कठीण होतं, असं रिकी पॉटिंग म्हणाला आहे. या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये पुजारानं ३१९ बॉलमध्ये १०६ रनची खेळी केली. पुजाराच्या या खेळीमुळे भारतानं पहिल्या इनिंगमध्ये ४४३ रन केले. या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला तर पुजाराचं शतक कायम लक्षात राहिलं, पण जर भारताला या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करायला वेळ कमी पडला तर पुजाराच्या खेळीवर प्रश्न उपस्थित होतील, अशी प्रतिक्रिया पॉटिंगनं दिली.

चेतेश्वर पुजाराचं टेस्ट क्रिकेटमधलं हे १७वं शतक होतं. २८० बॉलमध्ये त्यानं हे शतक पूर्ण केलं. चेतेश्वर पुजाराचं त्याच्या कारकिर्दीमधलं हे सगळ्यात संथ शतक आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा तो ६८ रनवर खेळत होता. पहिल्या दिवशी पुजारानं ६८ रन करायला २०० बॉल घेतले होते. याआधी २०१२ साली मुंबईमध्ये इंग्लंडविरुद्ध पुजारानं २४८ बॉलमध्ये शतक केलं होतं.

भारताचा ओपनर हनुमा विहारीनं १२.१२ च्या स्ट्राईक रेटनं ६६ बॉलमध्ये ८ रन केले. तर पुजाराचा स्ट्राईक रेट ३३.२३ एवढा होता. भारताच्या ८ बॅट्समनमध्ये हा सगळ्यात कमी स्ट्राईक रेट होता. भारतानं ४४३ रन २.६१ रन प्रती ओव्हरच्या सरासरीनं केले.

भारतीय बॉलरना जर दोन वेळ ऑस्ट्रेलियाचा ऑल आऊट करून मॅच जिंकता आली नाही, तर चेतेश्वर पुजाराच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले जातील, असं पॉटिंग म्हणाला. पुजारा बॅटिंग करत असताना रन रेट वाढवणं नेहमीच कठीण असतं, अशी प्रतिक्रिया पॉटिंगनं दिली. भारतीय टीममध्ये इतर खेळाडू जलद खेळू शकतात, पण जर त्यांना जलद खेळ करता आला नाही तर पुजाराच्या खेळीमुळे भारताला मॅच जिंकणं कठीण होऊन जातं, असं वक्तव्य पॉटिंगनं केलं.

चेतेश्वर पुजाराला मात्र त्याच्या या खेळीबद्दल काहीच आक्षेप नाही. मेलबर्नच्या या खेळपट्टीवर एका दिवसात २०० रन करणंही कठीण होतं, असं पुजारा म्हणाला. ३० वर्षांचा चेतेश्वर पुजारा या सीरिजमधला सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. पुजारानं या सीरिजमध्ये ६५.६० च्या सरासरीनं ३२८ रन केले.

याआधी ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्येही पुजारानं शतक केलं होतं. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये पुजारानं १२३ रनची खेळी केली होती. तर दुसऱ्या इनिंगमध्ये ७१ रन केले होते. यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये पुजाराला २४ आणि ४ रनच करता आल्या.