Ind vs Eng: 'जर विराटला फॅमिली टाइम हवा असेल तर त्याने...', इंग्लंडच्या खेळाडूने स्पष्टच सांगितलं, 'हा वर्ल्ड क्रिकेटला धक्का'

IND vs ENG Test: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. विराट कोहली पुढील 2 सामन्यांसाठीही विश्रांती घेण्याची शक्यता आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 8, 2024, 12:45 PM IST
Ind vs Eng: 'जर विराटला फॅमिली टाइम हवा असेल तर त्याने...', इंग्लंडच्या खेळाडूने स्पष्टच सांगितलं, 'हा वर्ल्ड क्रिकेटला धक्का' title=

IND vs ENG Test: भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. दरम्यान पुढील 3 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमधून विश्रांती घेतलेला स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) संघात परतणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे. दरम्यान काही रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली इंग्लंडविरोधातील पुढील सामन्यांमध्येही खेळणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. विराट कोहली पुढील 2 सामन्यांसाठीही विश्रांती घेण्याची शक्यता आहे. यादरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने (Nasser Hussain) विराट कोहली नसणं भारतच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मोठा झटका असल्याचं म्हटलं आहे.  

विराट कोहली पहिले दोन कसोटी सामनेही खेळला नव्हता. विराट कोहलीच्या जागी रजत पाटीदारला संघात स्थान देण्यात आलं आहे. पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. पण दुसरा सामना भारताने जिंकला. तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरु होणार आहे. या सामन्याआधी खेळाडूंना 10 दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. लवकरच संघाची घोषणा केली जाणार आहे. पण त्याआधी नासीर हुसेनने विराट कोहलीसंबंधी विधान केलं आहे. तसंच कुटुंबासाठी विश्रांती घेण्यावरही आपलं मत मांडलं आहे. 

'जागतिक क्रिकेटसाठी मोठा झटका'

नासिर हुसेनने स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, 'सध्या तरी तो खेळणार की नाही याबद्दल काही ठोस माहिती नाही. पुढील दोन सामने तो खेळेल अशी शक्यता आहे. काही वेळात संघाची घोषणा होणार आहे. पुढील 3 सामन्यात तो असेल की नाही याचीही माहिती नाही. पण हा मोठा झटका असणार आहे. हा भारतासाठी, मालिकेसाठी आणि जागतिक क्रिकेटसाठीही मोठा झटका असेल. ही एक विशेष मालिका आहे. पहिले दोन्ही सामने रंगतदार झाले'.

'कोहलीसारख्या खेळाडूची कमतरता जाणवेल'

नासिर हुसेनने पुढे म्हटलं की, "कोहली महान फलंदाज आहे. कोणत्याही मालिकेत आणि संघाला त्याची कमतरता जाणवेल. पण खेळालाही कोहलीसारख्या खेळाडूची काळजी घ्यावी लागेल. तो 15 वर्षांपासून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे आणि जर त्याला कुटुंबासह राहण्यासाठी काही वेळ हवा असेल तर काही वेळासाठी खेळापासून दूर राहावं".

"मी विराट कोहलीला शुभेच्छा देतो. याचा अर्थ आपण अँडरसन आणि विराट कोहली यांच्यातील रंगतदार लढत पाहू शकत नाही, जी गेल्या काही वर्षांपासून आपण अनुभवली आहे. कोहलीसाठी त्याचं कुटुंब आणि खासगी आयुष्य आधी येतं. हा भारतासाठी झटका आहे. जसं की आपण पाहिलं आहे त्यांच्याकडे चांगले तरुण फलंदाज आहेत. मागील सामन्यात जखमी झालेला केएल राहुलही परतणार असल्याचे अंदाज आहेत. त्याने गेल्या काही महिन्यात सर्व प्रकारांमध्ये भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. यामुळे भारताची फलंदाज मजबूत होईल," असंही नासीर हुसेनने म्हटलं आहे.