रोहितचा विक्रम! एकाच टेस्टमध्ये २ शतकं करून दिग्गजांच्या यादीत

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही रोहित शर्माने शतक झळकावलं आहे.

Updated: Oct 5, 2019, 04:22 PM IST
रोहितचा विक्रम! एकाच टेस्टमध्ये २ शतकं करून दिग्गजांच्या यादीत title=

विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही रोहित शर्माने शतक झळकावलं आहे. याआधी पहिल्या इनिंगमध्येही रोहित शर्माने शतकी खेळी केली होती. एकाच टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये शतकं करण्याचा विक्रम रोहितने केला आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ओपनिंग करताना दोन शतकं करणारा रोहित हा जगातला पहिला बॅट्समन ठरला आहे. तर मॅचमध्ये २ शतकं करणारा रोहित गावसकर यांच्यानंतरचा दुसरा भारतीय ओपनर आहे. विजय हजारे, सुनिल गावसकर (३वेळा), राहुल द्रविड (३ वेळा), विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांनीही एका टेस्टमध्ये २ शतकं केली आहेत.

१४९ बॉलमध्ये १२७ रन करुन रोहित शर्मा आऊट झाला. रोहितच्या या खेळीमध्ये १० फोर आणि ७ सिक्सचा समावेश होता. तर पहिल्या इनिंगमध्ये रोहितने २४४ बॉलमध्ये १७६ रन केले. रोहित शर्माबरोबरच दुसऱ्या इनिंगमध्ये चेतेश्वर पुजारानेही ८१ रनची खेळी केली. यामुळे भारताची आघाडी ३०० रनच्या पुढे गेली आहे.

चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची टीम ४३१ रनवर ऑल आऊट झाली. अश्विनने सर्वाधिक ७ विकेट घेतल्या, तर जडेजाला २ आणि इशांत शर्माला १ विकेट मिळाली. आफ्रिकेकडून डीन एल्गारने १६० रन आणि क्विंटन डिकॉकने १११ रन केले. कर्णधार फॅफ डुप्लेसिसला ५५ रन करता आले.