पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला गुरुवारपासून पुण्यात सुरुवात होत आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला होता. रोहित शर्मा, मयंक अग्रवाल आणि अश्विन भारताच्या विजयाचे शिल्पकार होते. पण कर्णधार विराट कोहलीला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. आता पुणे टेस्टमध्ये विराटला दोन विक्रम खुणावत आहेत.
विराट कोहलीने ८० टेस्ट मॅचमध्ये ५३.१२ च्या सरासरीने ६,८०० रन केले आहेत. यामध्ये २५ शतकं आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. पहिल्या टेस्टमध्ये विराटने २० रन आणि नाबाद ३१ रनची खेळी केली होती.
पुण्याच्या टेस्टमध्ये विराटने चांगली कामगिरी केली तर तो दिलीप वेंगसरकर यांचं रेकॉर्ड मोडू शकतो. वेंगसरकर यांच्या नावावर ११६ टेस्टमध्ये ६,८६८ रन आहेत. १९७६ ते १९९२ या कालावधीत खेळलेल्या टेस्ट मॅचमध्ये वेंगसरकर यांनी १७ शतकं केली. त्यांची सरासरी ४२.१३ एवढी होती. वेंगसरकर यांना रनच्या बाबतीत मागे टाकायला विराटला ६९ रनची गरज आहे.
विराट कोहलीला इंजमाम उल हकचा विक्रमही मोडण्याची संधी आहे. विराट आणि इंजमाम यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येकी २५-२५ शतकं केली आहेत. विराटनं शतक केलं तर तो स्टीव्ह स्मिथ आणि गॅरी सोबर्स यांच्या २६ शतकांची बरोबरी करेल.