मिताली राजने इतिहास घडवला, २० वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली महिला

भारताची कर्णधार मिताली राजने इतिहास घडवला आहे. 

Updated: Oct 9, 2019, 10:14 PM IST
मिताली राजने इतिहास घडवला, २० वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली महिला title=

बडोदा : भारताची कर्णधार मिताली राजने इतिहास घडवला आहे. २० वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी मिताली पहिली महिला खेळाडू बनली आहे. ३६ वर्षांच्या मिताली राजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये हा विक्रम केला आहे. या मॅचमध्ये मितालीने नाबाद ११ रन केले. भारताचा या मॅचमध्ये ८ विकेटने विजय झाला आहे.

भारताकडून २०४ वनडे खेळणाऱ्या मिताली राजने २६ जून १९९९ साली आयर्लंडविरुद्ध पहिली वनडे मॅच खेळली होती. आता आपल्या ५० ओव्हर क्रिकेटच्या कारकिर्दीत मितालीने २० वर्ष आणि १०५ दिवस पूर्ण केले आहेत. मितालीने पहिली टेस्ट आणि पहिली टी-२० २००६ साली खेळली होती.

मिताली राज २ दशकं वनडे क्रिकेट खेळणारी एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅच खेळण्याचा विक्रमही मितालीच्याच नावावर आहे. मितालीने आत्तापर्यंत २०४ वनडे मॅच खेळल्या. मितालीनंतर इंग्लंडच्या शार्लोट एडवर्डने १९१, भारताच्या झुलन गोस्वामीने १७८ आणि ऑस्ट्रेलियाच्या एलेक्स ब्लॅकवेलने १४४ मॅच खेळल्या आहेत. मितालीने १० टेस्ट आणि ८९ टी-२० मॅचमध्येही भारताचं प्रतिनिधीत्व केलं. मागच्याच महिन्यात मितालीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.