close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विराटचा डबल धमाका! ब्रॅडमननाही मागे टाकलं

विराट कोहलीनं आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. 

Updated: Oct 11, 2019, 07:25 PM IST
विराटचा डबल धमाका! ब्रॅडमननाही मागे टाकलं

पुणे : विराट कोहलीनं आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. पुणे टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने द्विशतक केलं आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि सर डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड मोडीत काढणारा, ४०वी सेंच्युरी झळकावणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

रनमशीन विराट कोहलीच्या बॅटमधून रनचा पाऊस सुरुच आहे. पुणे टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीनं द्विशतक ठोकलं आणि अनेक रेकॉर्डही मोडित काढले. विराटनं टेस्ट करियरमधील सातव्या द्विशतकाची नोंद केली.

आपल्या सातव्या द्विशतकाची नोंद करताच विराटनं सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागचा प्रत्येकी ६ टेस्ट द्विशतकांचा रेकॉर्डही मोडित काढला. याखेरीज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला. तसंच विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक ठोकणारा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला.

४० आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. सर डॉन ब्रॅडमन यांनी कर्णधार असताना आठवेळा १५०हून अधिक रन केल्या होत्या. तर विराटनं ९ वेळा कर्णधार म्हणून खेळताना १५० हून अधिक रन केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंगच्या नावे कर्णधार म्हणून सर्वाधिक ४१ शतकांची नोंद आहे. यामुळे आता रिकी पॉन्टिंगच्या रेकॉर्डशी बरोबरी साधण्यासाठी विराटला आता केवळ एका शतकाची गरज आहे. विराटच्या टेस्ट कारकिर्दीमधील हे २६वं टेस्ट शतक आहे. याखेरीज इतरही काही रेकॉर्डसची नोंद विराटनं या खेळीमध्ये केल्या.

विराट कोहलीचं हे द्विशतक खास ठरलं. कर्णधार म्हणून विराटची ही ५०वी टेस्ट आहे. आपल्या ५० व्या टेस्टमध्ये शतक झळकावणाऱ्यांच्या कर्णधारांच्या यादीत विराटने आता स्थान पटकावलं आहे. तर टेस्टमध्ये वेगाने ७ हजारांचा टप्पा गाठणाऱ्या बॅट्समनच्या यादीत गॅरी सोबर्स आणि कुमार संगकारासमवेत संयुक्त चौथं स्थानही पटकावलं. या वर्षात विराटला एकही शतक झळकावता आलं नव्हतं. अखेर विराटला सूर गवसला आणि तो अगदी अक्षरश: रेकॉर्डब्रेक बरसला.