मुंबई : India vs Sri Lanka, Asia Cup 2022: आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) टीम इंडियाला (Team India) सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेनेही सुपर-4 सामन्यात टीम इंडियाला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा खेळ अत्यंत वाईट होता. फलंदाजीत आणि गोलंदाजीत कोणाला फारशी चमक दाखवता आली नाही. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा एक खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरला. रोहित शर्मा याने या खेळाडूवर विश्वास दाखवून कुठेतरी मोठी चूक केली आहे, अशी प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.
आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या चारही मॅचमध्ये रोहित शर्मा वेगवेगळ्या प्लेइंग 11 घेऊन मैदानात उतरला. श्रीलंकेविरुद्ध मोठा निर्णय घेत त्याने पुन्हा एकदा ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश केला, पण यावेळीही ऋषभ पंत फ्लॉप ठरला. ऋषभ पंत याला पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली होती. मात्र, तो चमक दाखवू शकला नाही.
दिनेश कार्तिक याच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूच्या जागी सलग दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ऋषभ पंत याने 13 चेंडूत 17 धावा केल्यानंतर त्याची विकेट गमावली. ही पहिलीच वेळ नाही, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत याला केवळ 14 धावा करता आल्या. ऋषभ पंतला घेऊनही काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे रोहितचा पंतबाबतचा निर्णय चुकीचा ठरल्याचे बोलले जात आहे.
ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 57 टी-20 सामने खेळले आहेत. परंतु या सामन्यांमध्ये ऋषभ पंतने 23.44 च्या सरासरीने फक्त 914 धावा बनविल्या आहेत. त्याचबरोबर ऋषभ पंतने टी-20 क्रिकेटमध्ये केवळ 3 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. ऋषभ पंत पाकिस्तानविरुद्ध ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसला. येत्या सामन्यात ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला पुन्हा एकदा संघात संधी मिळू शकते.