मुंबई : भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० मॅचमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने या मॅचमध्ये त्यांच्या टीममध्ये बदल केलेला नाही. तर भारताने मात्र टीममध्ये २ बदल केले आहेत. रवींद्र जडेजाऐवजी मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहलऐवजी कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे.
वानखेडेची खेळपट्टी ही रन करण्यासाठी चांगली आहे. पहिले बॅटिंग करताना आम्ही सावध खेळ करतो, असं विराट कोहली टॉसवेळी म्हणाला. मागच्या मॅचमध्ये आम्ही १५ रन कमी केल्या होत्या. फिल्डिंगही खेळाचा महत्त्वाचा भाग आहे. आम्ही कॅच पकडले असते, तर गोष्टी वेगळ्या असत्या, असं वक्तव्य कोहलीने केलं. एखाद्या खेळाडूने ५० रन केल्या तर त्याने टीमसाठी आणखी २५ रन करणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टी-२०मध्ये विजय झाल्यानंतर तिरुवनंतपुरमच्या दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. त्यामुळे ही मॅच दोन्ही टीमसाठी करो वा मरो अशीच आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये ही मॅच खेळवली जात आहे.
वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजची कामगिरी चांगली झाली आहे. दुसरीकडे भारताला मात्र या मैदानात संघर्ष करावा लागला आहे. या मैदानात टीम इंडियाने ३ टी-२० मॅच खेळल्या यातल्या २ मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. २०१७ साली टीम इंडियाने श्रीलंकेला ५ विकेटने पराभूत केलं होतं. २०१२ साली इंग्लंडकडून आणि २०१६ साली वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाला वानखेडेवर पराभवाचा धक्का लागला होता.
वेस्ट इंडिजच्या टीमने या मैदानात २ मॅच खेळल्या आहेत. या दोन्ही मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला आहे. २०१६ साली वेस्ट इंडिजने या मैदानात इंग्लंड आणि भारताला हरवलं होतं.
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी
लिन्डल सिमन्स, एव्हीन लुईस, ब्रॅन्डन किंग, शिमरन हेटमायर, निकोलास पूरन, कायरन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, खेरी पियरे, हेडन वॉल्श, शेल्डन कॉट्रेल, केसरिक विलियम्स