रन आऊटच्या वादावर कोहली भडकला, पोलार्ड म्हणतो योग्य झालं

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेटने पराभव झाला.

Updated: Dec 16, 2019, 05:08 PM IST
रन आऊटच्या वादावर कोहली भडकला, पोलार्ड म्हणतो योग्य झालं title=

चेन्नई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेटने पराभव झाला. पहिले बॅटिंग करताना भारताने ५० ओव्हरमध्ये २८७/८ एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग करताना हेटमायर (१३९ रन) आणि शाय होप (१०२ नाबाद) यांनी शतक करुन वेस्ट इंडिजला जिंकवलं. या मॅचमध्ये हेटमायर आणि होपच्या शतकापेक्षा रवींद्र जडेजाच्या रन आऊटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. जडेजाच्या रन आऊटमुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीदेखील संतापला आहे.

माझ्या कारकिर्दीत मी असं कधीच बघितलं नाही, असं विराट म्हणाला तर जे झालं ते योग्यच असल्याचं वक्तव्य पोलार्डने केलं. भारताची बॅटिंग सुरु असताना ४८व्या ओव्हरमध्ये हा वाद झाला. जडेजाने या ओव्हरमध्ये जलद रन काढण्याचा प्रयत्न केला, पण क्रीजमध्ये पोहोचण्याआधीच रोस्टन चेसचा बॉल स्टम्पला लागला. बॉल स्टम्पला लागल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी अपील केलं, पण अंपायर शॉन जॉर्ज यांनी जडेजाला नॉट आऊट दिलं.

अंपायरनी नॉट आऊट दिल्यानंतर काही सेकंदांनी मैदानातल्या मोठ्या स्क्रीनवर रिप्ले दाखवण्यात आला. या रिप्लेमध्ये जडेजा आऊट होता. यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड अंपायरकडे गेला आणि त्यांना थर्ड अंपायरकडे जायला सांगितलं. अंपायर शॉन जॉर्ज यांनीही मग थर्ड अंपायरशी संपर्क साधला आणि थर्ड अंपायरने जडेजाला आऊट दिलं. वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममधून पोलार्डला थर्ड अंपायरकडे जायचा इशारा करण्यात आल्याचा आरोप विराटने केला आहे.

या सगळ्या घटनाक्रमावर विराटने मॅच संपल्यानंतर भाष्य केलं. 'फिल्डरने अपील केल्यानंतर अंपायरने त्याला नॉट आऊट दिलं. मैदानाबाहेर बसणारी लोकं मैदानात काय करायचं ते ठरवू शकत नाहीत. मैदानात जे काही झालं, तसं मी कधीच बघितलं नाही,' असं विराट म्हणाला.

'जे झालं ते योग्य झालं, कारण शेवटी बरोबर निर्णय देण्यात आला. योग्य निर्णय दिला जाणं माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे,' असं वक्तव्य कायरन पोलार्डने केलं.