मेलबर्न : महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद ८७ धावांच्या जोरावर भारताने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या निर्णायक सामन्यात विजय प्राप्त केला. भारताने सात गडी राखून हा सामना जिंकला व मालिकाही खिशात घातली. या विजयामुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच एकदिवसीय मालिकेत विजय मिळवण्याची कामगिरी करुन दाखवली आहे. एकूण तीन सामन्यांच्या या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये धोनीने अर्धशतकी खेळी साकारली होती. त्यानंतर आजही धोनीने ११४ चेंडूत ८७ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. केदार जाधवने ५७ चेंडूत ६१ धावा करून त्याला चांगली साथ दिली. या मालिकेपूर्वी धोनीच्या कामगिरीवर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र, मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावून धोनीने टीकाकारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली. भारताची पहिली विकेट 15 धावांवर गेली. या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या रोहितला तिसऱ्या सामन्यात आपल्या कामगिरीत सातत्य ठेवता आले नाही. रोहित शर्मा अवघ्या 9 धावा करुन बाद झाला. रोहितला पीटर सिडलने शॉन मार्शकरवी झेलबाद केले.
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार विराट कोहली याने शिखर धवनच्या सोबतीने भारताचा डाव सावरला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 44 धावा जोडल्या. यानंतर शिखर धवन मार्कस स्टोइनिसच्या गोलंदाजीवर 23 धावांवर आऊट झाला. धवन बाद झाल्यानंतर धोनी मैदानात आला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या खेळीमुळे भारताच्या खेळीला स्थिरता मिळाली. पण कोहली जास्त वेळ टिकू शकला नाही. विराट कोहलीला झाए रिचर्डसनने 46 धावांवर असताना बाद केले. यानंतर आलेल्या केदार जाधवने धोनीला उत्तम साथ दिली. धोनी-केदार जाधव यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 121 धावांची विजयी भागीदारी केली. धोनीने नाबाद 87 धावा केल्या तर केदारने नाबाद 61 धावा केल्या.
What a run-chase. The Dhoni-Jadhav duo take #TeamIndia to a thumping 7-wicket victory. India take the series 2-1 #AUSvIND pic.twitter.com/vb4fZ0xwR9
— BCCI (@BCCI) January 18, 2019
याआधी नाणेफेक जिंकत भारताने ऑस्ट्रे्लियाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आंमत्रित केले. ऑस्ट्रेलियाने 48.4 षटकात 230 धावा केल्या. या डावात सर्वाधिक धावा या पीटर हॅन्डसकॉम्बने केल्या. त्याने 58 धावांची खेळी केली. पीटर हॅन्डसकॉम्बचा अपवाद वगळता इतर कोणत्याही खेळाडूला योग्य साथ देता आली नाही. ऑस्ट्रेलियाला सुरुवाती पासूनच झटके देण्याची सुरुवात भारतीय गोलंदाजानी केली. चहलने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. तर त्याला मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी 2-2 विकेट घेत उत्तम साथ दिली.