IBSA World Games: जे पुरुषांना जमलं नाही, ते महिलांनी करुन दाखवलं; ऑस्ट्रेलियाला धूळ चारत ठरल्या विश्वविजेत्या

आईबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात भारताने 9 गडी राखत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.   

Updated: Aug 27, 2023, 11:49 AM IST
IBSA World Games: जे पुरुषांना जमलं नाही, ते महिलांनी करुन दाखवलं; ऑस्ट्रेलियाला धूळ चारत ठरल्या विश्वविजेत्या title=

Indian Blind Womens Cricket: भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. इंटरनॅशनल ब्लाइंड स्पोर्ट्स फेडरेशन (आईबीएसए) वर्ल्ड गेम्स 2023 मध्ये जबरदस्त कामगिरी करत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात भारताने 9 गडी राखत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील अंतिम सामना बर्मिंघम येथे खेळण्यात आला. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. यानंतर डकवर्थ लुईस नियमामुसार भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आलं. 

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय महिला संघाने आपल्या कामगिरीने सर्वांची मनं जिंकली आहे. महिला संघाने आपल्या लीगमधील सर्व सामने जिंकले आणि अपराजित राहिला. भारतीय संघाने अंतिम सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 114 धावांवर ऑस्ट्रेलिया संघाला रोखलं होतं. ऑस्ट्रेलियाने यादरम्यान 8 गडी गमावले होते. भारताने यानंतर 3.3 ओव्हरमध्ये 42 धावा केल्या. यानंतर डकवर्थ लुईस नियमामुसार भारताला विजयी घोषित केलं. 

गेल्या आठवड्यात आईबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये अंध क्रिकेट संघांचे सामने सुरु झाले होते. यावेळी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना पार पडला. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेला हा वर्ल्ड गेम्समधील पहिला अंतिम सामना होता. जो भारताने 9 गडी राखत जिंकला. 

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात फार चांगली झाली नाही. चौथ्या ओव्हरमध्ये त्यांनी पहिली विकेट गमावली. यानंतर ऑस्ट्रेलियाने पॉवर-प्लेमध्ये 29 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 39 धावांवर 3 गडी बाद होती. यानंतर सी लुईस आणि वेबेक यांनी 54 धावांची भागीदारी करत डाव सावरला. पण भारताने पुनरामगन करत ऑस्ट्रेलियाला रोखलं. अखेर ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 114 धावा केल्या. 

भारताने आव्हानाचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात केली. भारताने फक्त 3.3 ओव्हरमध्येच 42 धावा ठोकल्या.भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये होता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करताना भारताने फक्त 3.3 ओव्हरमध्ये 42 धावा केल्या असताना पाऊस आला. यानंतर नियमानुसार भारताला विजयी घोषित केलं.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

पुरुष संघाचा पाकिस्तानकडून पराभव

महिला संघाने सुवर्णपदक जिंकल्यानंतर अंतिम सामन्यात दाखल झालेला पुरुष संघही सुवर्णपदक जिंकेल अशी आशा होती. पण पाकिस्तानने पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. पाकिस्तानने 8 गडी राखत भारताचा पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावत 184 धाा केल्या होत्या. पाकिस्तानने 15 व्या ओव्हरलाच लक्ष्य पूर्ण केलं.