CRICKET - लंका जिंकण्यासाठी युवा टीम इंडिया सज्ज, धवन आणि कोच द्रविडचा फोटो बीसीसीआयने केला ट्विट

भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार

Updated: Jun 27, 2021, 09:18 PM IST
CRICKET - लंका जिंकण्यासाठी युवा टीम इंडिया सज्ज, धवन आणि कोच द्रविडचा फोटो बीसीसीआयने केला ट्विट title=

मुंबई : श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ सज्ज झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात प्रत्येकी 3 सामन्यांची एकदिवसीय आणि टी-20 मालिका होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा एक फोटो बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. 

युवा भारतीय टीम सज्ज

श्रीलंका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड़ (Rahul Dravid) यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यात बोलताना प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताचे युवा खेळाडू श्रीलंकेत चांगली कामगिरी करतील असा विश्वास कर्णधार शिखर धवन याने व्यक्त केला आहे. खेळाडू दौऱ्यासाठी उत्साहित असून नव्या आव्हानांसाठी सज्ज असल्याचंही धवन यानं म्हटलंय. खेळाडूंनी आयपीएल आणि इतर स्पर्धांमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे, त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे, असं धवनने म्हटलं आहे.

अनुभवी आणि युवा खेळाडूंचा संघ

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने 20 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. यात अष्टपैलू हार्दिक पांड्या, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल यांचा समावेश आहे. तसंच संघात ईशान किशन आणि संजू सॅमसन या दोन यष्टीरक्षकांना संधी देण्यात आली आहे. 

बीसीसीआयने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संघातील युवा खेळाडू आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत. तसंच या खेळाडूंना एकत्र येऊन सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे खेळाडू जोरदार सराव करत आहेत.

असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज : ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग

भारत - श्रीलंका मालिकेचं वेळापत्रक

एकदिवसीय मालिका
- पहिला एकदिवसीय सामना – 13 जुलै
- दुसरा एकदिवसीय सामना – 16 जुलै
- तिसरा एकदिवसीय सामना – 18 जुलै

टी-20 मालिका
- पहिला टी-20 सामना – 21 जुलै
- दुसरा टी-20 सामना – 22 जुलै
- तिसरा टी -20 सामना – 25 जुलै