हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या अटीतटीच्या टी-२० सामन्यात भारताचा ४ धावांनी पराभव झाला आहे. भारताच्या पराभवामुळे न्यूझीलंडने ३ सामन्यांची मालिका २-१ च्या फरकाने खिशात घातली आहे. भारताला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १६ धावांची गरज होती. पण कृणाल पांड्या आणि दिनेश कार्तिक या जोडीला ११ धावाच करता आल्या. या दोघांनी अखेरच्या बॉलपर्यंत कीवींना कडवी झुंज दिली. भारताकडून सर्वाधिक ४३ धावा विजय शंकरने केल्या. तर रोहित शर्माने ३८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट मिचेल सॅण्टनर आणि डॅरिल मिचेलनी घेतल्या. या दोघांना प्रत्येकी २ विकेट मिळाल्या.
New Zealand take the series 2-1!
The Blackcaps hold off India despite a late charge from Krunal Pandya and Dinesh Karthik to win by four runs in Hamilton.#NZvIND scorecard https://t.co/Prav9ucvl2 pic.twitter.com/Udx6Y6MNIE
— ICC (@ICC) February 10, 2019
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या भारतीय संघाची वाईट सुरुवात झाली. भारताची पहिली विकेट ६ धावांवर गेली. सलामीवीर शिखर धवन ५ धावा करुन तंबूत परतला. धवन बाद झाल्यानंतर आलेल्या विजय शंकरच्यासोबतीने कर्णधार रोहितने भारताचा डाव सावरला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी झाली. विजय शंकर ४३ धावंची खेळी करुन बाद झाला. विजय शंकरने आपल्या खेळीत ५ चौकार आणि २ सिक्सर लगावले. शंकरचा चांगल्या प्रकारे मैदानात जम बसला होता, पण त्याला मोठी खेळी करण्यास अपयश आले.
चौथ्या क्रमांकावर आलेल्या ऋषभ पंतने तडाखेबाज खेळी केली. ऋषभ पंतने १२ बॉलमध्ये ३ सिक्स आणि १ चौकाराच्या मदतीने २८ धावा केल्या. तिसऱ्या विकेटसाठी रोहित आणि ऋषभ पंत या जोडीने ४० धावा जोडल्या. भारताची धावसंख्या १२१ असताना ऋषभ पंत २८ धावांवर बाद झाला. काही वेळाने रोहित शर्मादेखील ३८ धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पांड्याने २१ धावा केल्या. या खेळीत २ सिक्स आणि १ चौकार लगावला.
हार्दिक पांड्याला जास्त वेळ खेळपट्टीवर घालवता आला नाही. पांड्या २१ धावा करुन माघारी परतला. धोनीला देखील आजच्या सामन्यात विशेष काही करता आले नाही. धोनीने २ धावा करुन पॅव्हेलियनचा रस्ता धरला. भारताच्या मध्य क्रमातील फलंदाजांनी निराशा केली. एकवेळ भारताचा स्थिर असलेल्या डाव पत्त्यासारखा कोसळला. भारताने आपले ३ विकेट १४१-१४५ या धावसंख्येदरम्यान गमावले. धोनीचा अपवाद वगळता प्रत्येक खेळाडूने चांगली खेळी केली. पण कोणत्याच खेळाडूला अखेरपर्यंत टिकून राहून भारताला विजय मिळवून देण्यास अपयश आले.
याआधी भारताने नाणेफेक जिंकून यजमान न्यूझीलंडला फलंदाजी करण्यास भाग पाडले. न्यूझीलंडने आपल्या डावाची चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ८० धावा जोडल्या. टीम सायफर्ट आणि कॉलीन मुनरो यांच्यात ८० धावांची तडाखेदार भागीदारी झाली. या जोडीला तोडण्यास कुलदीप यादवला यश आले. धोनीने टीम सायफर्टला स्टम्पिंग केले.
न्यूझीलंडकडून दुसऱ्या विकेटसाठी कॉलीन मुनरो आणि कर्णधार केन विलियमसन यांच्यात ५५ धावांची भागीदारी झाली. गेल्या अनेक सामन्यांपासून आपल्या गोलंदाजीने विरोधी संघाला हैराण करुन सोडणाऱ्या भारतीय गोलंदाजांना या सामन्यात विकेटसाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. न्यूझीलंडकडून सर्वाधिक ७२ धावा कॉलीन मुनरोने केल्या. तर टीम सायफर्टने ४३ आणि कॉलीन डी ग्रँडहोमने ३० धावा केल्या. न्यूझीलंडने २० ओव्हरमध्ये ४ बाद २१२ धावा केल्या. भारताकडून कुलदीपने २ तर भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमदने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.