रोहित-विराटची जोडी आणखी एका विक्रमाजवळ

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली तिसरी वनडे आज होणार आहे.

Updated: Aug 14, 2019, 04:37 PM IST
रोहित-विराटची जोडी आणखी एका विक्रमाजवळ title=

पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली तिसरी वनडे आज होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता या मॅचला सुरुवात होईल. भारत ३ मॅचच्या या सीरिजमध्ये १-०ने आघाडीवर आहे. पहिली मॅच पावसामुळे रद्द झाली होती. तिसऱ्या मॅचसाठी जेव्हा भारतीय टीम मैदानात उतरेल, तेव्हा विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीच्या समोर एक रेकॉर्ड असेल.

विराट आणि रोहितची जोडी वनडे क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १ हजार रनची पार्टनरशीप करण्यापासून २७ रन दूर आङे. या दोघांमध्ये २७ रनची पार्टनरशीप झाली, तर वेस्ट इंडिजविरुद्ध १ हजार रनची पार्टनरशीप करणारी ही पहिली जोडी ठरेल.

रोहित शर्माने २१७ वनडे मॅचमध्ये ४८.७४ च्या सरासरीने ८,६७६ रन केले आहेत. तिसऱ्या वनडेमध्ये रोहितने २६ रन केले, तर तो युवराज सिंगचं ८.७०१ रनचा विक्रमही मोडेल. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित २३व्या क्रमांकावर आहे.

वनडेतल्या शतकांच्या बाबतीत रोहितला दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाला मागे टाकण्याची आणि श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याची बरोबरी करण्याची संधी आहे. रोहित शर्माची वनडेमध्ये २७ शतकं आहेत. अमलानेही वनडेमध्ये एवढीच शतकं केली आहेत. काहीच दिवसांपूर्वी अमलाने निवृत्तीची घोषणा केली. तर सनथ जयसूर्याने वनडेमध्ये २८ शतकं केली.

सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित संयुक्तरित्या पाचव्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह पहिल्या आणि विराट ४२ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.