इंजमाम उल हकचा निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

वर्ल्ड कप २०१९ मध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली. 

Updated: Jul 18, 2019, 07:59 PM IST
इंजमाम उल हकचा निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा title=

लाहोर : वर्ल्ड कप २०१९ मध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली. स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानला प्रवेश करता आला नाही. यानंतर इंजमाम उल हकने पाकिस्तानच्या निवड समिती सदस्याचा राजीनामा दिला आहे. ३० जुलैला इंजमाम उल हक यांचा कार्यकाळ संपणार होता. पत्रकार परिषद घेऊन इंजमाम यांनी राजीनाम्याची घोषणा केली. राजीनाम्याची हीच योग्य वेळ असल्याचं इंजमाम यांनी सांगितलं. 

'जेव्हा मी इंग्लंडमधून परतलो तेव्हाच पीसीबीला आपल्याला या पदावर राहायचं नसल्याचं सांगितलं. २०१६ पासून मी या पदावर होतो. यामध्ये मी चांगला वेळ घालवला. नव्या लोकांना यामध्ये आलं पाहिजे,' असं इंजमामने सांगितलं. ४९ वर्षांच्या इंजमाम यांनी एप्रिल २०१६ साली निवड समिती अध्यक्षाचं पद स्वीकारलं होतं.

पीसीबीच्या प्रशासनामध्ये नव्या भूमिकेत दिसणार का? असा प्रश्न इंजमाम यांना विचारण्यात आला. 'मी एक क्रिकेटपटू आहे. हे माझ्या उदर्निवाहाचं साधन आहे. जर बोर्डाने मला दुसरी जबाबदारी दिली तर मी याचा विचार करीन,' असं उत्तर इंजमाम याने दिलं. 

'वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने फायनलमध्ये पोहोचणाऱ्या दोन्ही टीमना हरवलं. आम्ही लागोपाठ ४ मॅच जिंकलो, पण आम्हाला सेमी फायनल गाठता आली नाही हे दुर्देवी आहे,' असं इंजमाम म्हणाले.