आयपीएल २०१९ : सौरव गांगुलीची दिल्ली कॅपिटल्सचा सल्लागार म्हणून निवड

आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होत आहे. 

Updated: Mar 14, 2019, 06:07 PM IST
आयपीएल २०१९ : सौरव गांगुलीची दिल्ली कॅपिटल्सचा सल्लागार म्हणून निवड title=

नवी दिल्ली : आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होत आहे. या मोसमात भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला नवीन जबाबदारी मिळाली आहे. सौरव गांगुलीची दिल्ली कॅपिटल्स टीमचा सल्लागार म्हणून निवड झाली आहे. सौरव गांगुली हा दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगसोबत काम करेल.

दिल्ली कॅपिटल्सचा सल्लागार झाल्यानंतर सौरव गांगुली म्हणाला, 'दिल्ली टीमचा सल्लागार म्हणून निवड झाल्यामुळे मी खुश आहे. मी जिंदल ग्रुप आणि जेएसडब्ल्यूला अनेक वर्षांपासून ओळखतो. दिल्ली टीमचा हिस्सा झाल्यामुळे मी उत्साही आहे. खेळाडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत काम करण्याची मी वाट बघत आहे.'

'सौरव गांगुली हा जागतिक क्रिकेटमधल्या सर्वोत्तम खेळाडूपैकी एक आहे. सौरव गांगुलीमुळेच भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या. सौरव गांगुली दिल्लीच्या टीमशी जोडला गेला हा आमच्यासाठी सन्मान आहे. त्याचा अनुभव, मार्गदर्शन आणि सल्ला आमच्यासाठी मोलाचा ठरेल. सौरव आम्हाला परिवारासारखा आहे,' अशी प्रतिक्रिया दिल्ली कॅपिटल्सचे चेअरमन पार्थ जिंदल यांनी दिली.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सची टीम आयपीएलमध्ये खेळेल. यावर्षी या टीमनं त्यांचं नाव दिल्ली डेअरडेव्हिल्सवरून दिल्ली कॅपिटल्स केलं आहे. आतापर्यंत एकदाही दिल्लीला आयपीएल स्पर्धा जिंकता आली नाही. त्यामुळे आता नाव बदलल्यामुळे आणि सौरव गांगुलीची सल्लागार म्हणून निवड केल्यानंतर तरी भाग्य बदलेल, अशी अपेक्षा दिल्लीच्या टीमची असेल. २४ मार्चला दिल्लीची पहिली मॅच मुंबईशी वानखेडे स्टेडियमवर होईल.