मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यासाठी आता प्रत्येक टीमने तयारीला सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याच्या सरावाला सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सच्या नेट प्रॅक्टीसमध्ये हार्दिक पांड्याने हेलिकॉप्टर शॉट मारले. हार्दिक पांड्याने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा शॉट मारण्यामागे माझं प्रेरणास्थान कोण असेल सांगा? असं ट्विट पांड्याने केलं आहे.
Guess my inspiration behind this shot? pic.twitter.com/9mwQ6uNg3g
— hardik pandya (@hardikpandya7) March 14, 2019
कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये यॉर्कर बॉलवर सिक्स किंवा फोर मारणं सगळ्यात कठीण असतं. पण यॉर्करसाठी हेलिकॉप्टर शॉट हा प्रभावी ठरतो. धोनीनं हेलिकॉप्टर शॉटचा अतिशय प्रभावीपणे वापर केला आहे.
मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून हार्दिक पांड्या जास्त क्रिकेट खेळलेला नाही. आशिया कपवेळी हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती यामुळे तो टीमच्या बाहेर होता. या दुखापतीमुळे पांड्याला ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या दौऱ्याला मुकावं लागलं होतं. यानंतर कॉफी विथ करण शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हार्दिक पांड्याचं निलंबन झालं होतं. निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आल्यानंतर पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या काही मॅच खेळला. यानंतर हार्दिकला पुन्हा एकदा पाठीच्या खालच्या भागाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे हार्दिक ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील टी-२० आणि वनडे सीरिजला मुकला.
दुखापतीनंतर आता हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मैदानात येण्यासाठी सज्ज झाला आहे. ही गोष्ट मुंबईची टीम आणि त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासादायक आहे. भारताच्या या ऑलराऊंडरची ओळख विस्फोटक बॅट्समन म्हणून आहे. याचबरोबर तो चांगला बॉलरही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिकने ६७ सिक्स लगावले आहेत. (टेस्टमध्ये १२, वनडेमध्ये ३६, टी-२०मध्ये १९) तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्याने आत्तापर्यंत ९७ विकेट घेतल्या आहेत. (टेस्ट १७, वनडे ४४ आणि टी-२० ३६ विकेट)