आयपीएलला सुरु होण्याआधीच धक्का, या देशांचे खेळाडू अर्धावेळच उपलब्ध

आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Mar 18, 2019, 02:25 PM IST
आयपीएलला सुरु होण्याआधीच धक्का, या देशांचे खेळाडू अर्धावेळच उपलब्ध title=

मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण याआधीच आयपीएलला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने अजूनही खेळाडूंना आयपीएलसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला नाही. दक्षिण आफ्रिकेला आता श्रीलंकेविरुद्ध टी-२० सीरिज खेळायची आहे. वर्ल्ड कपआधीची दोन्ही देशांची ही शेवटची सीरिज आहे. ही टी-२० सीरिज २४ मार्चला संपेल.

श्रीलंकेविरुद्धची सीरिज संपल्यानंतरच खेळाडूंनी भारतात जावं, असं दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला वाटत आहे. तर काही खेळाडूंना मात्र पहिल्यापासूनच आयपीएलमध्ये खेळायचं आहे.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे अधिकारी म्हणाले की, 'खेळाडूंना आयपीएलला उपलब्ध करण्यासाठी सीईओ थाबंग मोरो, अध्यक्ष क्रिस नानजानी आणि प्रशिक्षक ओटीस गिबसन केपटाऊनच्या न्यूलंड्समध्ये बैठक करणार आहेत. या बैठकीत खेळाडूंना कधी सोडून द्यायचं याचा निर्णय घेण्यात येईल. खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत हे मान्य आहे. पण खेळाडू देशासाठी खेळण्यासाठी प्रतिबद्ध आहेत हे विसरता कामा नये.'

या सगळ्या प्रकरणावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही प्रतिक्रिया दिली आहे. 'दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंबद्दलचा अंतिम निर्णय लवकरच होईल. सध्या दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये व्यस्त आहेत. वनडे सीरिजनंतर आता ते श्रीलंकेविरुद्ध ३ टी-२० मॅचची सीरिज खेळणार आहेत. २४ मार्चला ही सीरिज संपेल. यामुळे सुरुवातीच्या काही मॅचमध्ये हे खेळाडू खेळणं असंभव आहे', असं वक्तव्य बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही उशीरा येणार

दक्षिण आफ्रिकेबरोबरच ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही आयपीएलमध्ये उशीरा येतील. ऑस्ट्रेलियाची टीम पाकिस्तानविरुद्ध युएईमध्ये ५ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. ही सीरिज ३१ मार्चला संपणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू या सीरिजनंतरच आयपीएलमध्ये दिसतील.

या देशांचे खेळाडू लवकर जाणार

एकीकडे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलमध्ये उशीरा सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे इंग्लंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशचे खेळाडू आयपीएलमधून लवकर माघारी जातील. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडची टीम आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर पाकिस्तानची टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर असेल. त्यामुळे मे महिन्यापासून इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये दिसणार नाहीत.

दुसरीकडे वेस्ट इंडिज, बांग्लादेश आणि आयर्लंडमध्ये ५ मेपासून ट्राय सीरिजला सुरुवात होणार आहे. यासाठी वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशचे खेळाडू रवाना होतील. ८ मेपासून अफगाणिस्तानच्या स्कॉटलंड दौऱ्याला सुरुवात होईल. यामुळे अफगाणिस्तानचे खेळाडूंनाही आयपीएल मध्येच सोडून जावं लागेल.

या सगळ्या वेळापत्रकारवर नजर टाकली तर परदेशी खेळाडूंपैकी न्यूझीलंडची टीम संपूर्ण कालावधी आयपीएलसाठी उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेची टीम पहिला आठवडा सोडला तर उरलेल्या आयपीएलमध्ये उपलब्ध असतील. पण आगामी वर्ल्ड कप लक्षात घेता या खेळाडूंनीही माघार घेतली किंवा संबंधित खेळाडूंच्या देशांच्या क्रिकेट बोर्डांनी खेळाडूंना परत बोलावलं, तर मात्र आयपीएलला फटका बसू शकतो.

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यामुळे प्रत्येक क्रिकेट बोर्ड त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत होऊ नये आणि जास्त शारिरिक ताण पडू नये म्हणून लक्ष ठेवून असणार आहेत.