IPL 2020: विराटने या बॉलरचा घेतलाय धसका, 7 वेळा केलंय आऊट

विराटला आतापर्यंत 7 वेळा पाठवलंय माघारी...

Updated: Nov 6, 2020, 04:36 PM IST
IPL 2020: विराटने या बॉलरचा घेतलाय धसका, 7 वेळा केलंय आऊट title=

अबुधाबी : सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माकडे बॉल स्विंग करण्याची उत्तम क्षमता आहे आणि म्हणूनच त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये घेतलेल्या 108 विकेटपैकी निम्मे विकेट पॉवरप्लेमध्ये आले आहेत. संदीपने विराट कोहलीला आयपीएलमध्ये एकूण 7 वेळा बाद केले, हा वैयक्तीक विक्रम आहे. या सात पैकी त्याने 4 वेळा पॉवरप्लेमध्ये कोहलीला बाद केले आहे.

संदीपचे मार्गदर्शक आणि पंजाब रणजी करंडक संघाचे मुख्य प्रशिक्षक मुनीष बाली म्हणाले की, "संदीपच्या गोलंदाजीची क्षमता माझ्या आधीच लक्षात आली होती. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याची मनगटची स्थिती आणि दोन्ही बाजूंला बॉल स्विंग करण्याची क्षमता."

मुनीष बाली म्हणाले की, 'म्हणूनच तो फलंदाजाला आव्हान देण्यास यशस्वी झाला आहे आणि ते त्याच्या मनातही आहे. कोहलीच्या नेतृत्वात 2008 साली विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय   अंडर -19 संघाचे सहायक प्रशिक्षक बाली होते. 

मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळलेल्या सामन्यात संदीपने पॉवरप्लेमध्ये आपली 53 वी विकेट घेतली आणि पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या झहीर खानच्या विक्रमाची बरोबरी केली. झहीरसोबत कोहलीला बाद करण्याचा विक्रमही त्याने केला आहे.

बाली म्हणाले की, 'मी त्याला अगदी सुरुवातीपासूनच पाहिले आहे. त्याने अनेकदा कोहलीला बाद केले यात मला आश्चर्य वाटत नाही. मागील हंगामात त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये हरियाणाविरूद्ध 19 रन देत 7 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे वडोदराला चांगला फायदा झाला होता. इतर मोठ्या फलंदाजांमध्ये संदीपने रोहित शर्मा आणि ख्रिस गेलला चार वेळा बाद केले आहे.

संदीपची आकडेवारी पाहिल्यास त्याने जसप्रीत बुमराहची जवळपास बरोबरी केली आहे. दोघांनी 90 सामने खेळले आहेत. बुमराहने 105 तर संदीपने 108 विकेट घेतल्या आहेत.

या हंगामात आयपीएलमध्ये संदीपने 11 सामन्यांत प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी 7.34 धावा देऊन 13 विकेट्स घेतल्या आहेत. 2010 आणि 2012 अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये संदीपने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2012 मध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकणार्‍या संघाचा तो महत्त्वाचा भाग होता आणि स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणार्‍या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो प्रथम क्रमांकावर होता.