IPL 2022 : ठरलं! या तारखेला होणार खेळाडूंचा लिलाव, बीसीसीआयने केली घोषणा

आयपीएल २०२२ मध्ये यंदा १० संघांचा समावेश असून चुरस आणखी वाढणार आहे

Updated: Jan 11, 2022, 08:02 PM IST
IPL 2022 : ठरलं! या तारखेला होणार खेळाडूंचा लिलाव, बीसीसीआयने केली घोषणा title=

IPL Auction 2022 : आयपीएल गव्हर्निंग काऊन्सीलची आज बैठक पार पडली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आयपीएलमध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या लखनऊ आणि अहमदाबाद फ्रँचायझींना औपचारिक मान्यता देण्यात आली आहे. गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ही घोषणा केली. 

यासोबतच बोर्डाने आयपीएल लिलावाच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरू इथं खेळाडू्ंचा लिलाव पार पडणार आहे. बोर्डाने अहमदाबाद आणि लखनौ या दोन नवीन संघांना लिलावापूर्वी ड्राफ्टद्वारे प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे.

25 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयने दोन नवीन संघांची घोषणा केली होती. RPSG समूहाचे मालक संजीव गोयंका यांनी लखनौ फ्रँचायझीवर बोली लावली होती आणि CVC कॅपिटलने अहमदाबाद फ्रँचायझीवर बोली लावली होती.

काय आहेत लिलावाचे नियम
अहमदाबाद आणि लखनऊ संघाला ड्राफ्टद्वारे प्रत्येकी तीन खेळाडूंची निवड करता येणार आहे.

दोनही संघाना खेळाडू निवडीसाठी दोन आठवड्यांचा अवधी मिळणार

राज्य आणि देशांच्या क्रिकेट संघटना खेळाडूंची यादी लिलावासाठी सादर करतील

खेळाडूंच्या नोंदणीनंतर लिलावासाठी अंतिम यादी तयार होईल

लखनऊने गौतम गंभीरची मेंटर म्हणून केली नियुक्ती
लखनऊ फ्रँचायझीने कोचिंग स्टाफची घोषणा केली आहे.  भारताचे माजी सलामीवीर आणि कोलकाता नाईट रायडर्सला दोनदा चॅम्पियन बनवणारा कर्णधार गौतम गंभीरला संघाचा मेंटर म्हणून नियुक्त केलं आहे. झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षकपदी तर विजय दहिया यांची सहायक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुलला लखनौ फ्रँचायझीचा कर्णधार बनवले जाऊ शकतं, अशी शक्यता आहे.

हार्दिक पांड्या अहमदाबादचा कर्णधार?
अहमदाबाद फ्रँचाईझीने  2011 मध्ये टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या गॅरी कर्स्टनला टीमचा मेंटर बनवलं आहे. तर भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं जाईल अशी चर्चा आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या विक्रम सोलंकी यांची संघाचे संचालक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या अहमदाचा संघाचा कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याच्यासोबत मुंबई इंडियन्सचा माजी यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आणि सनरायझर्स हैदराबादचा माजी फिरकीपटू रशीद खान यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.