Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: आयपीएलच्या सोळावा हंगामातील सहावा सामना आज खेळवला जाणार आहे. महेंद्रसिंग धोणीची चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि केएल राहुलची लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) दरम्यान चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधीच चेन्नईसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे आजचा सामना तो खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
एम एस धोणी दुखापतग्रस्त
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सविरुद्ध विकेटकिपिंग करताना धोनी दुखापतग्रस्त झाला होता. सामन्याच्या एकोणीसव्या ओव्हरमध्ये दीपक चहरच्या गोलंदाजीवर स्टम्पमागे धोणीने उडी मारत चौकार अडवण्याचा प्रयत्न केला. उडी मारताना तो गुडघ्यावर आपटला आणि यामुळे तो दुखापतग्रस्त झाला. धोनीच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती. त्यामुळे मैदानावर फिजिओ बोलवण्यात आला होता. त्यामुळे दुसरा सामना धोनी खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पण संघ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार धोणी पूर्णपणे फिट असून आजचा सामना खेळणार आहे.
सीएसके प्रशिक्षकाने दिले अपडेट
धोणीच्या दुखापतीबद्दल सीएसकेचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनीही माहिती दिली आहे. धोणीच्या गुडघ्याला छोटी दुखापत होती. पण यातून तो पूर्णपणे सावरला आहे. धोणी अजूनही तितकाच फिट असल्याचं फ्लेमिंग यांनी म्हटलं आहे. धोणी दिग्गज आणि महान खेळाडू असून त्याच्यामुळे टीमचं मनोबल वाढतं असं फ्लेमिंग यांनी सांगितलं.
पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव
आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्स आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स संघादरम्यानच्या सामन्याने झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात गुजरातने चेन्नईचा तब्बल 5 विकेटने पराभव केला. चेन्नईने पहिली फलंदाजी करता निर्धारित 20 षटकात 7 विकेट गमावत 178 धावा केल्या. विजयाचं हे आव्हान गुजरातने 19.2 षटकात 5 विकेट गमावत पूर्ण केलं.
चेन्नई सुपर किंग्स
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, अंबति रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर, प्रशांत सोलंकी, महेश ठीकशाना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधु, काइल जेमिसन, अजय मंडल आणि भगत वर्मा