IPL 2024: आयपीएल स्पर्धा सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस राहिले आहेत. आयपीएलच्या 17 व्या हंगामात अनेक खेळाडू आपल्या जुन्या संघात परतले असल्याने त्या संघांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. यामध्ये खासकरुन हार्दिक पांड्या आणि गौतम गंभीर यांचा समावेश आहे. गुजरात संघ सोडून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. तर दुसरीकडे गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर म्हणून परतला आहे. गौतम गंभीरने याआधी संघाला दोन वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे.
गौतम गंभीरने कोलकाताचं नेतृत्व करताना आतापर्यंत दोनवेळा स्पर्धा जिंकून दिली आहे. दरम्यान आता तो मेंटॉरंच्या भूमिकेत जाऊन संघाच्या विजयाची खात्री करत आहे. आपण जेव्हा संघ सोडून जाऊ तेव्हा तो चांगल्या स्थितीत असेल असा विश्वास गौतम गंभीरने व्यक्त केला आहे. गौतम गंभीरने याआधीही केकेआर संघाला वाईट स्थितीतून बाहेर आणलं आहे. पहिल्या तीन हंगामात केकेआर संघ नॉक आऊटमध्येही पोहोचू शकला नव्हता. पण चौथ्या हंगामापासून गौतम गंभीर संघाशी जोडला गेला आणि यश मिळालं.
"मी तुम्हाला खात्री देतो की, जेव्हा मी हा जागा (केकेआर) सोडून जाईन तेव्हा संघ आहे त्यापेक्षा चांगल्या स्थितीत असेल," असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. एका प्रमोशनल कार्यक्रमात तो बोलत होता. यावेळी त्याने केकेआर संघ, मालक शाहरुख खान आणि सहकाऱ्यांचे गेल्या कित्येक वर्षांपासून मिळणाऱ्या पाठिंब्यासाठी आभार मानले आहेत.
"मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. मी केकेआरला यशस्वी बनवलं नाही. केकेआरने मला यशस्वी बनवलं. केकेआरने मला लीडर बनवलं," अशा भावना गौतम गंभीरने व्यक्त केल्या आहेत. पुढे त्याने म्हटलं आहे की, "मला हाताळणं फार कठीण आहे. मला शाहरुख खान आणि संघाचा व्यवस्थापकीय संचालक वेंकी यांचे आभार मानायचे आहेत. अनेक वर्ष त्यांनी माझी नाटकी सहन केली".
गौतम गंभीर आपल्या स्पष्टवक्तेपणा तसंच रागासाठी ओळखला जातो. त्यामुळे स्थानिक क्रिकेट प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासह त्याचे संबंध कसे राहतील हा औत्सुक्याचा विषय असेल. दरम्यान आपण संघात सामील झालो तेव्हाच शाहरुख खानने सर्व स्वातंत्र्य दिलं असल्याची माहिती गौतम गंभीरने दिली आहे.
"शाहरुख खानने मी संघात खेळाडू म्हणून सहभागी झालो होतो तेव्हाही शाहरुख खानने हीच गोष्ट सांगितली होती. ही तुझी फ्रँचाइजी आहे, तिला बनव किंवा मोडून टाक असं तो म्हणाला होता," अशी माहिती गौतम गंभीरने दिली.