IPL 2024: आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार असून सर्व संघ कसून सराव करत आहेत. आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने अनेक देशातील खेळाडू भारतात खेळताना दिसतील. पण पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी असल्याने ते या स्पर्धेत दिसत नाहीत. पण पाकिस्तानी चाहत्यांची मात्र आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळताना पाहण्याची इच्छा आहे. बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदीसारखे खेळाडूही भारतीय खेळाडूंसह खेळताना दिसावेत असं त्यांना वाटत आहे. खेळाडूंवरील बंदी उठवत त्यांना सीमेपार खेळण्यासाठी बोलवावं अशी मतं पाकिस्तानी चाहते मांडत आहेत. दरम्यान एका पाकिस्तानी चाहत्याच्या अशाच पोस्टवर हरभजन सिंगने भन्नाट उत्तर दिलं आहे.
या पोस्टमध्ये पाकिस्तानी चाहत्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात विराट कोहली-बाबर आझम, मुंबई इंडियन्समध्ये शाहीन आफ्रिदी-जसप्रीत बुमराह तसंच चेन्नई संघात मोहम्मद रिझवान आणि धोनी यांना एकत्र खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने या पोस्टमध्ये एडिटेड फोटो शेअर केले आहेत. "अनेक भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न," अशी कॅप्शन त्याने दिली आहे.
यावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने यावर भन्नाट उत्तर दिलं आहे. आम्ही भारतीय अशी स्वप्नं पाहू शकत नाही असा टोला त्याने लगावला आहे. "कोणताही भारतीय अशी स्वप्नं पाहत नाही. तुम्ही लोकांनी स्वप्न पाहणं बंद करा आणि झोपेतून उठा," असं हरभजन सिंग म्हणाला आहे.
No indian hv such dreams .. you guys plz stop dreaming wake up now https://t.co/EmraFXiIah
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 15, 2024
नव्या हंगामासाठी सर्व संघांनी सराव सुरु केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विराट कोहलीशिवाय आपल्या कॅम्पला सुरुवात केली आहे. आयपीएलमध्ये पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. 22 मार्चला पहिला सामना होत आहे.
नवीन मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि क्रिकेट संचालक मो बॉबट यांच्या मार्गदर्शनाखाली बहुतेक खेळाडू शिबिरात सामील झाले आहेत. दरम्यान बीसीसीआयच्या सूत्राने कोहली पुढील काही दिवसांत संघाशी जोडला जाईल अशी माहिती दिली आहे.