IPL 2024: जर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) अशाच प्रकारे संघाचं नेतृत्व करत राहिला तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही असं स्पष्ट मत भारतीय संघाचा माजी खेळाडू मनोज तिवारीने (Manoj Tiwary) मांडलं आहे. राजस्थान रॉयल्सविरोधातील सामन्यात घेतलेल्या काही वाईट निर्णयांमुळे झालेल्या पराभवानंतर मनोज तिवारीने हे मत मांडलं आहे. Cricbuzz शी संवाद साधताना मनोज तिवारी काहीसा चिडलेला दिसला. राजस्थाविरोधातील सामन्यात जसप्रीत बुमरहाकडे नवा चेंडू सोपवण्याऐवजी स्वत: गोलंदाजी घेतल्याने त्याने हार्दिक पांड्यावर टीका केली.
22 एप्रिलला जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबईचा पराभव केला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 180 धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थान रॉयल्सने 18.4 ओव्हर्समध्येच हे आव्हान पूर्ण केलं. या सामन्यात मुंबईकडे नीट धोरण नव्हतं, ज्याचा त्यांना फटका बसला असं मनोज तिवारीने म्हटलं आहे.
"जर तुमच्याकडे जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज आहे, तर मग तुम्ही पहिली ओव्हर त्याला का देत नाही? बटरलने शतक ठोकलं होतं, यशस्वी जैसवाल चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता, अशा स्थितीत तुम्ही विकेट मिळवण्यासाठी आपल्या सर्वोत्तम गोलंदाजाकडे चेंडू सोपवायला हवा होता. हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याला 2 चौकार लगावण्यात आले. यामुळे बॉलची चमक काहीशी गेली आणि चेंडू स्विंग होण्याची शक्यताही कमी झाली. फलंदाजांसाठी अनेक गोष्टी सहज झाल्या," असं मनोज तिवारीने सांगितलं.
"अशा मूर्ख चुका केल्या जात असल्याने मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत वरती येताना मला अजिबात दिसत नाही," असं परखड मत मनोज तिवारीने मांडलं आहे. मनोज तिवारीने आपल्या विश्लेषणात पुढे सांगितलं की, मुंबईची सर्वात मोठी समस्या ही होती की त्यांनी 8 सामने खेळले होते आणि वरच्या संघांनी 7 खेळले होते. मुंबई संघ सध्या गुणतालिकेत 6 गुणांसह 7 व्या स्थानावर आहे.
"जर अशा प्रकारचं नेतृत्व कायम राहिलं तर ते प्लेऑफमध्ये पोहोचणार नाहीत. याआधी खेळाडू रोहित शर्मासह होते. आता मुंबईच्या खेळाडूंनी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून स्विकारलेलं नाही असं वाटत आहे," असंही मनोज तिवारीने म्हटलं.
मुंबईचा पुढील प्रवास आता फारच आव्हानात्मक असणार आहे. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सध्या 7 व्या स्थानी कायम आहे. मुंबईचा नेट रननेट -0.23 असल्याने आता त्यांना नेट रननेट देखील सुधारावा लागणार आहे.
मुंबई इंडियन्सला आणखी 6 सामने खेळायचे आहेत. मुंबईला जर प्लेऑफ गाठायचं असेल तर उर्वरित 6 सामन्यांपैकी 5 सामने तरी जिंकावे लागणार आहेत. या 6 सामन्यांपैकी मुंबईला लखनऊविरुद्ध 2 आणि केकेआरविरुद्ध 2 सामने खेळायचे आहेत. तर तगड्या हैदराबादसोबत 1 सामना तर दिल्लीविरुद्ध देखील 1 सामना खेळायचा आहे. उर्वरित 6 सामन्यांपैकी 3 सामने मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेवर खेळणार आहे. त्यामुळे आता मुंबईसाठी ही एक जमेची बाजू असेल.