कोलकाता : आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यामध्ये पार पडला. या लिलावात मुंबईच्या टीमनी ६ खेळाडूंना विकत घेतलं. मुंबईने नॅथन कुल्टर नाईलसाठी ८ कोटी रुपये, क्रिस लीनसाठी २ कोटी रुपये, सौरभ तिवारीसाठी ५० लाख, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख आणि प्रिन्स बलवंत राय यांच्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये मोजले.
आयपीएलचा लिलाव सुरु झाला तेव्हा पहिलंच नाव क्रिस लिनचं पुकारलं गेलं. लिनसारख्या आक्रमक खेळाडूवर मोठी बोली लागेल, असा अंदाज होता. पण मुंबईने त्याला बेस प्राईजलाच विकत घेतलं. क्रिस लिनला विकत घेतल्यानंतर आता मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने मुंबई टीमचे मालक अंबानींना प्रश्न विचारला आहे.
आता रोहित शर्मा कुठे बॅटिंग करेल? असा प्रश्न रोहितने मुंबई इंडियन्सच्या लाईव्ह व्हिडिओ दरम्यान विचारला आहे. मागच्या मोसमात मुंबईने रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉकला ओपनिंगला खेळवलं होतं. मुंबईने मागची आयपीएल स्पर्धाही जिंकली होती, त्यामुळे ओपनर असलेल्या लिनला खेळवायचं असेल तर त्यांना मागच्या वर्षीचा फॉर्म्युला बदलावा लागू शकतो.
मुंबईच्या टीममध्ये आधीच डिकॉक, रोहित, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, इशान किशन, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यासारखे तगडे खेळाडू आहेत. त्यामुळे लिनला खेळवायचं असेल तर रोहित शर्माला खालच्या क्रमांकावर बॅटिंगला यायला लागू शकतं, अशात सूर्यकुमार यादव किंवा इशान किशन यांच्यापैकी एकाला टीममध्ये स्थान मिळणार नाही. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे रोहित शर्माने विचारलेला हा प्रश्न टीम प्रशासनाला खरंच अडचणीचा ठरू शकतो.